
इचलकरंजी ता.८ राजमाता जिजाऊंच्या जीवनातील विविध घडामोडीमधून समतेच्या तत्त्वाचा विकास झालेला दिसून येतो.परंपरेने दिलेल्या ओळखीला नाकारत जिजाऊंनी स्वतःची नवीन ओळख निर्माण केली.सार्वजनिक क्षेत्रात कृतिशील पणे सहभाग घेणारी स्त्री अशी स्वतःची नवी ओळख त्यांनी घडवली. स्त्री पुरुष भेदभाव संकल्पनेचा ऱ्हास घडवून आणला .स्त्री पुरुष समतेचे प्रतीक म्हणून शिव-शक्ती आणि सखा- सखी हे आदर्श समाजापुढे ठेवले.ही दोन्ही प्रतीके स्वीकारणे याचा अर्थ आरंभीच्या आधुनिक काळात समतेची मुहूर्तमेढ रोवणे असाच होतो. या दोन्ही संकल्पनांचा विलक्षण प्रभाव स्वराज्यावर पडला. या संकल्पना मराठी राज्यसंस्थेच्या ऱ्हासापर्यंत टिकून होत्या. त्यामुळे राजमाता जिजाऊ या सकलजनावादी अर्थात भूमीवर असलेल्या प्रत्येकाला समजून घेण्याच्या क्रांतीच्या शिल्पकार ठरतात.असे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक व शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.प्रकाश पवार यांनी केले.ते समाजवादी प्रबोधिनी आणि श्रीमती आ. रा.पाटील कन्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
कालवश उषाताई पत्की स्मृती जागर व्याख्यानमालेत
” राजमाता जिजाऊ :सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार ” या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे होते. मंचावर ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर ,प्रो. डॉ. त्रिशला कदम, प्रसाद कुलकर्णी , शशांक बावचकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महामानवांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली.प्रा. कॅप्टन प्रमिला सुर्वे यांनी स्वागत केले. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महाविद्यालयाच्या अस्मिता या वार्षिक अंकाचे प्रकाशनही करण्यात आले.यावेळी कालवश उषाताई पत्की व समाजवादी प्रबोधिनीचे जुने जाणते कार्यकर्ते महालिंग कोळेकर यांना आदरांजली वाहण्यात आली.
प्रा.डॉ.प्रकाश पवार म्हणाले, राजमाता जिजाऊ आजच्या काळात जगण्याचा मार्ग दाखवतात. व्यक्तीची प्रतिष्ठा गुणवत्तेवर आधारित झाली पाहिजे ही त्यांची भूमिका होती. त्यांनी जातीय विषमतेला विरोध केला. अहिंसेचा पुरस्कार केला. भौतिक आणि सांस्कृतिक घटकांचा विचार गंभीरपणे केला. ईश्वराच्या संकल्पनेला जीवनलक्षी स्वरूपाचा अर्थ दिला. त्यांचा समग्र विचार हा वेगवेगळ्या बाजूने सुधारक ठरतो. जिजाऊंच्या ओंजळीत सरतेशेवटी स्वराज्याचे सार्वभौमत्व, स्वराज्याला अधिमान्यता,प्रजेचे कल्याण, स्वातंत्र्य, स्वशासन,समता ,न्याय, सहिष्णुता, सामाजिक सलोखा अशी सकल जनवादी मूल्ये शिल्लक राहिली आणि तोच सकलजनवादी मूल्यात्मक वारसा जिजाऊंनी आपल्याला दिलेला आहे. प्रा. डॉ.पवार यांनी सकल जनवादी परंपरा, पूर्वसूरींचा वारसा,जिजाऊंची जडणघडण ,समतेच्या मूल्यांची पेरणी, स्वराज्याची जडणघडण आणि स्थापना आणि जिजाऊंची चिरंतन प्रेरणा या मुद्द्यांच्या आधारे अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य बाबासाहेब दुधाळे यांनी नव्या पिढीने आणि खास करून विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांचा वैचारिक आदर्श जपला पाहिजे असे प्रतिपादन केले.यावेळी डॉ. तारा भवाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रा.डॉ. धीरज शिंदे यांनी आभार मानले. सूत्रसंचलन शिवानी सूर्यवंशी आणि सलोनी मडीवार यांनी केले. महाविद्यालयाच्या संस्थामाता सुशीला साळुंखे सभागृह झालेले आहे या कार्यक्रमास प्रा.डॉ. अविनाश सप्रे ,प्रा. रमेश लवटे, रामचंद्र ठीकणे ,प्रा.डॉ,सुभाष जाधव, प्रा . डॉ.संगीता पाटील, सौदामिनी कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद व नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.