साने गुरुजींच्या साहित्यातून प्रेमाचा, शांततेचा, दुःखमुक्तीचा संदेश दिला -ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार

साने गुरुजींच्या साहित्यातून प्रेमाचा, शांततेचा, दुःखमुक्तीचा संदेश दिला -ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार

इचलकरंजी ता.२१ समाजातील सर्व घटकांना व्यापणारे आणि कवेत घेणारे साहित्य साने गुरुजींनी निर्माण केले. तत्कालीन हिंदू-मुस्लिम दंगलींतून संपूर्ण समाजाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी साने गुरुजींनी आस्तिक ही कादंबरी १९३३ साली नाशिकच्या तुरुंगात लिहिली. देतो तो देव आणि राखतो राक्षस असे सांगत विषमता मानतो तो देव नाही. भूमिका साने गुरुजी मांडतात.आस्तिक हे प्रेमाचा प्रतिक आहे. नागांना आणि आर्याना त्यांन प्रेम शिकवलं. दंगलीतून जीवनाचे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत तर माणसातील चांगुलपणा, प्रेम, सद्भावनाच समाजाला विकासाकडे नेत असते हा विचार साने गुरुजींनी आस्तिक या कादंबरीद्वारे दिला आहे.गुरुजींनी या कादंबरीत तक्षक नागाला मानवी रूपात दाखविलेले दूरदर्शीत्व आणि प्रतिभेची प्रगल्भता अत्युच्च दर्जाची आहे. आज जात्यांधता आणि धर्मांधता पद्धतशीरपणे पसरविली जात असल्याच्या काळात या कादंबरीचा समकालीन संदर्भ मोठा आहे,असे मत ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार यांनी व्यक्त केले. ते साने गुरुजी समविचारी मंच आणि समाजवादी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी जन्मशताब्दी निमित्त आयोजित व्याख्यानात ‘ ‘साने गुरुजींची आस्तिक कादंबरी ‘ या विषयावर बोलत होते. प्रास्ताविक जावेद मोमीन यांनी केले. प्रसाद कुलकर्णी यांनी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांचे शाल व ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. मंचावर अनिल होगाडे यांचे प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. राजेंद्र कुंभार म्हणाले, जन्मेजयाचे सर्पसत्र आणि आस्तिक ऋषी यांच्या संदर्भाच्या पौराणिक कथेचा आधार घेऊन ही कादंबरी गुरुजींनी लिहिली.माणसातील सतप्रवृत्तीवर विश्वास ठेवून मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास जे करतात तेच खरे आस्तिक.असे आस्तिक हेच मानवी समाजाची आशा आहे.आज अशा माणसांची नितांत आवश्यकता आहे ही त्यांची भूमिका होती. रूपकांचे अर्थ कसे लावले पाहिजेत याची शिकवण साने गुरुजींनी या कादंबरीतून दिली आहे. पौराणिक कथेला रुपकानी आकार देत गुरुजींनी या कादंबरीत प्रेम आणि ऐक्याचा मौलिक संदेश दिलेला आहे. भारतात सर्व धर्माच्या आणि संस्कृतीच्या माणसांना एकत्र समाधानाने राहता येईल ही महान कल्पना आज गुरुजींचा ध्यास होता. समाजात द्वेषाची बीजे रुजविण्यासाठी जे प्रयत्न करतात ते समाजाला मूलभूत बाबींपासून दूर नेत असतात.त्यांना समाजासमोर उघडे पाडावे लागेल.त्यासाठी निर्भयपणे ठाम भूमिका घेत गल्लीपासून व्यापक प्रबोधन करण्याची गरज आहे. सदविचाराची माणसे सक्रिय होत नाहीत म्हणून दुर्विचार वाढत चालला आहे. त्यामुळे जगामध्ये प्रेमभावनेची, चांगुलपणाची नव्याने प्रस्थापना करावी लागेल. हिंसा करायला धैर्य लागत नाही ते कमालीचे भ्याड असतात.हिंसेतून हिंसाच जन्मत असते. म्हणूनच साने गुरुजींच्या साहित्यातून प्रेमाचा, शांततेचा, दुःखमुक्तीचा जो संदेश दिला आहे तो फार महत्त्वाचा आहे. प्राचार्य डॉ.कुंभार यांनी या विषयाची अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी करताना महाभारत ,रामायण, उपनिषदे,स्मृती,पुराणे, स्तोत्रे, धर्मग्रंथ,धर्म प्रार्थना असे अनेक संदर्भ देत मानवी जीवनातील समूहभावना, प्रेमभावना,स्नेहभाव, चांगुलपणा हीच खरी भारतीय संस्कृती आहे हे अधोरेखित केले. तसेच ४५ वर्षांपूर्वी शालेय जीवनामध्ये वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक मिळवताना थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या हस्ते आस्तिक हे पुस्तक भेट मिळाल्याची आठवणही त्यांनी सांगितली.

यावेळी डॉ. तुषार घाटगे, शशांक बावचकर,जयकुमार कोले, किरण कटके ,सुनील बरवाडे, अशोक चौगुले , संजय होगाडे, राजन मुठाणे, सुषमा साळुंखे, संभाजी खोचरे ,गीता खोचरे ,प्रा. रमेश लवटे, देवदत्त कुंभार ,सचिन पाटोळे, नौशाद शेडबाळे, शकील मुल्ला, मनोहर नवनाळे, अशोक केसरकर, शोभा इंगळे, आशिया बागवान, सुरेश कोळी, पद्मजा इंगळे, सूर्यकांत ढवळे, मच्छिंद्र आंबेकर, महादेव कांबळे बबन बन्ने ,रोहित दळवी, अमित कोवे,दामोदर कोळी, सौरभ पवार, अशोक वरूटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. विनायक होगाडे यांनी आभार मानले.

फोटो : साने गुरुजींची आस्तिक कादंबरी या विषयावर बोलताना प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार मंचावर जावेद मोमीन , प्रसाद कुलकर्णी व अनिल होगाडे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *