संघटन शक्ती’ हिच आपली ताकद आहे ती वाढविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे -भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे आवाहन

संघटन शक्ती’ हिच आपली ताकद आहे ती वाढविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे -भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे आवाहन

मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) आपल्या सगळ्यांची ताकद ही संघटन शक्ती आहे. बूथवरील संघटन शक्ती ताकदीने वाढवली पाहिजे. लोकशाहीत सगळ्यात मोठे हत्यार मतदानाचे असते. त्यासाठी संघटन शक्तीने काम केले पाहिजे. राष्ट्रभक्तीची भावनासुद्धा काम करताना क्षणाक्षणाला उजागर केली पाहिजे, असे आवाहन भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केले आहे. ते उत्तर मुंबई जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीत बोलत होते.

शनिवारी कांदिवली येथे केंद्रीय वाणिज्य मंत्री, खासदार पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर मुंबई जिल्हा विस्तारीत कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला ज्येष्ठ नेते राम नाईक, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, आमदार सुनील राणे, आमदार योगेश सागर, आमदार भाई गिरकर, आमदार मनिषा चौधरी यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यकारिणी बैठकीत आमदार अतुल भातखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. त्या ठरवाला प्रविण दरेकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले की, या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी विराजमान झालेत. दहा वर्ष दिवसरात्र कष्ट घेऊन देशाला एका उंचीवर नेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न केला. देशातील जनतेने पुन्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर आणि दहा वर्षाच्या कारकिर्दीवर विश्वास ठेऊन केंद्रात आपले सरकार बसले. देशात विपरीत परिस्थिती निर्माण झालेली असतानाही जनतेने कौल आपल्या बाजूने दिला आणि तिसऱ्यांदा मोदींना विराजमान केले. मात्र आपल्या मनात एक शल्य आहे की, पंतप्रधान मोदींनी, केंद्रातील सरकारने देशासाठी अविरत काम केले परंतु देशात विपरीत परिस्थितीत आपले सरकार आले त्याचा आनंदही आपण व्यक्त करु शकलो नाही. आपण नाराज, ना उमेद झालो, मग या देशाच्या पंतप्रधानांना काय वाटले असेल. दिवसरात्र या देशासाठी काम केले, परदेशात प्रवास करून आपल्या देशाचे नावलौकिक केले, परंतु या सगळ्या गोष्टीतून नव्या उमेदीने दुसऱ्या दिवसापासून कामाला लागणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधानांनी कामाला सुरुवात केल्यानंतर देशाला ज्या उपलब्धी दिल्या, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील घटकांना जो न्याय देण्याचा प्रयत्न केलाय तो तळागाळापर्यंत पोचवण्याची जबाबदारी या अभिनंदनाच्या ठरवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांची असल्याचे दरेकर म्हणाले.

तसेच असे एकही क्षेत्र नसेल की त्या क्षेत्राला मोदींच्या अर्थसंकल्पाचा स्पर्श लाभला नाही. काँग्रेसची एवढ्या वर्षाची काळीकुट्ट कारकीर्द असताना पुन्हा दहा वर्षानी देशाला प्रगतीकडे नेण्याचे काम मोदींनी केले. जनतेसाठी जवळपास ५ कोटींची तरतूद केली. महिला, शेतकऱ्यांसह समाजातील सर्व वर्गाना न्याय देण्याचा प्रयत्न मोदी सरकारच्या माध्यमातून झालाय. हे करत असताना महाराष्ट्रालाही भरभरून देण्याचे काम मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेय. केंद्राने मुंबईसाठी अनेक योजना दिल्या. राज्य आणि केंद्र सरकार मिळून मुंबईच्या पायाभूत सुविधांत अमूलाग्र बदल होतोय. जे गेल्या ५० वर्षात मुंबईत होऊ शकले नाही ते शिंदे सरकार आणि मोदींच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे मुंबईला बघायला मिळत असल्याचे दरेकर म्हणाले.

दरेकर पुढे म्हणाले की, बोरिवली ते ठाणे भुयारी मार्ग होतोय. कोकणासाठी रेल्वे सोडण्याचे काम खासदार पियुष गोयल यांच्या मागणीनुसार रेल्वे मंत्र्यांनी केले. या सर्व गोष्टी झाल्यानंतरही विरोधकांनी जनतेत चुकीचा नॅरेटिव्ह निर्माण केल्याने आपल्याला २४० वर थांबावे लागले. याचे आत्मचिंतन करून कार्यकर्त्यांनी आता जोमाने कामाला लागण्याची गरज आहे. उत्तर मुंबईतील कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केले. महाराष्ट्रात सगळ्यात उत्तम समन्वयातून काम कुठे झाले असेल तर ते उत्तर मुंबईच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिले.

केवळ भारतातील शक्ती आपल्या विरोधात काम करत नाही तर आज या साऱ्या शक्ती, सगळे पक्ष, सगळ्या जाती धर्माची लोकं एकत्रित का झाले याचे कारण आज जगाच्या बाजारात भारत ज्या गतीने पुढे जातोय याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांना आवरले पाहिजे ही भुमिका घेऊन या साऱ्या देश विघातक शक्ती काम करत आहेत.

दरेकर पुढे म्हणाले की, आज आपला राष्ट्रीय पक्ष जगातील मोठा पक्ष आहे. मोदींसारखे जबरदस्त नेतृत्व आपल्याकडे आहे. उत्तर मुंबईसाठी पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्या विश्वासातील मंत्री पियुष गोयल असल्याने आपल्या विकासाला निश्चितच गती मिळणार आहे. या सर्व गोष्टींचा लाभ घेऊन आपला पक्ष भक्कम करणे आणि संघटन मजबूत करण्याची आवश्यकता आहे. आपल्या सगळ्यांची ताकद ही संघटन शक्ती आहे. बूथवरील संघटन शक्ती ताकदीने वाढवली पाहिजे. लोकशाहीत सगळ्यात मोठे हत्यार मतदानाचे असते. त्यासाठी संघटन शक्तीने काम केले पाहिजे. राष्ट्रभक्तीची भावनासुद्धा काम करताना क्षणाक्षणाला उजागर केली पाहिजे, असेही दरेकरांनी म्हटले.

सर्व देश विघातक शक्तींना

झुगारून मोदी पंतप्रधान झाले

मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान पदी विराजमान झाले हे आपल्या देशाचे भाग्य आहे. आपल्या पक्षाचे भाग्य नाही. ज्या राष्ट्र विघातक शक्ती संपूर्ण जगातून मोदींचे नेतृत्व हटवू पाहत होते मात्र देशातील जनतेने सांगितले आम्हाला तिसऱ्यांदा मोदीच हवेत आणि सगळ्या शक्तींचा जो काही आगडोंब होता त्याला झुगारून तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी विराजमान झाले असल्याचा पुनःरूच्चारही दरेकरांनी केला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *