संसार उपयोगी भांड्याच्या सेट सहित इतर सर्व 33 बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी त्वरीत करा अन्यथा आंदोलन!*
13 ऑगस्ट रोजी ठीक दुपारी बारा वाजता सांगली निवारा भवन येथील बांधकाम कामगारांच्या भव्य मेळाव्यामध्ये बोलताना कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की, सध्या महाराष्ट्राच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे उपकारामधून 25000 कोटी पेक्षाही जास्त रक्कम जमलेली आहे. ज्या प्रमाणात रक्कम जमली आहे त्या प्रमाणात त्याचे लाभ कामगारांच्या कल्याणकारी योजना महाराष्ट्र शासनाच्या कडून राबवल्या जात नाहीत.
त्याऐवजी महाराष्ट्रातील या मंडळाची सर्व कामे अत्यंत विलंबाने सुरू आहेत. वास्तविक 2009 साली महाराष्ट्र शासनाने असा निर्णय केलेला आहे की बांधकाम कामगारांची कामे एका महिन्यात पूर्ण केली जातील परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र नोंदीत बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्यावर त्याचे वर्ष श्राद्ध झाले तरी त्याला अंत्यविधीची रक्कम सुद्धा मिळत नाही .
नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी 51 हजार रुपये देण्याची तरतूद आहे. परंतु मुलीचे लग्न झाल्यानंतर त्या मुलीला बाळ झाल्यानंतरही ती रक्कम त्याच्या बापाला आणि त्या मुलीला मिळत नाही अशी स्थिती आहे.
सध्या बांधकाम कामगार नोंदणीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून आश्चर्य म्हणजे आज जर नोंदणीचा अर्ज दाखल केला तर त्याची कागदपत्रे तपासून तो अर्ज मंजूर होण्यासाठी सध्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून ऑनलाइन पद्धतीने जून 2025 च्या तारखा दिल्या जात आहेत. अशाही प्रकारे नोंदणीकृत बांधकाम कामगारांची चेष्टा या मंडळाकडून सध्या सुरू आहे.
देशातील काही राज्यांच्या मध्ये नोंदीत बांधकाम कामगारांसाठी नवीन सायकली दिल्या जातात. महिला बांधकाम कामगारांसाठी नवीन शिलाई मशीन दिली जाते इतकेच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालयाने आम्ही दाखल केलेल्या आमच्या संघटनेने दाखल केलेल्या केसमध्ये आदेश केलेला आहे की बांधकाम कामगारांना बोनस देण्याबाबत निर्णय करावा पण त्याचीही अंमलबजावणी महाराष्ट्र शासन करीत नसून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दररोज अपमान केला जात आहे.
या मेळावा मध्ये बोलताना रंजना खोत या महिला नोंदणीकृत बांधकाम कामगार यांनी आपली प्रतिक्रिया दिली की ,त्यांनी असे सांगितले की सध्या संसार उपयोगी भांडे मिळण्याचे सुरू आहे वास्तविक रोख रक्कम मिळण्याऐवजी भांड्याचे साहित्य मिळत असल्यामुळे किमान संसार उपयोगी या वस्तू मिळत असल्यामुळे या वस्तू चालू राहणं गरजेचं आहे.
आठ दिवसांमध्ये राज्यातील सर्व थकीत अर्जांचा निपटारा कल्याणकारी मंडळाकडून नाही केल्यास राज्यातील बांधकाम कामगार आठ दिवसानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे प्रमुख निमंत्रक कॉ शंकर पुजारी यांनी बांधकाम कामगारांच्या मेळाव्यामध्ये दिला.
या मेळाव्यामध्ये निवारा बांधकाम कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी प्रा शरयू बडवे, अनिसा शेख, विशाल बडवे, जगदीश निरगुडे, सतीश म्हेत्रे, रणजीत कांबळे, बाळासाहेब वसगडेकर सॉलिया सौदागर इत्यादींनी मेळाव्यामध्ये सक्रिय भागीदारी केली.