४५ हजाराची लाच घेताना
अन्न सुरक्षा निरीक्षकास अटक
कोल्हापूर : (प्रतिनिधी) करवीर तालुका कोगे मधील फरसाण व वेफर्स उत्पादकाकडून ४५ हजाराची लाच घेताना अन्नसुरक्षा निरीक्षक विकास रोहिदास सोनवणे व.व. ५०, रा. १०१ लाईफस्टाईल अपार्टमेंट, प्रतिभानगर यांना अँटी करप्शन विभागाने अटक केली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, विकास सोनवणे यांनी करवीर तालुक्यातील कोगे येथील फरसाण व वेफर्स उत्पादकाच्या फर्मला ५ ऑगस्टला भेट देऊन तेथील तेल,बेसण, मिरची पावडरचे नमुने घेतले व तुमचे लायसन रद्द का करू नये अशी नोटीस दिली होती. यानंतर फर्मचे मालक सोनवणे यांना भेटण्यासाठी गेले असता सोनवणे यांनी त्यांच्याकडे ८५ हजार लाचेची मागणी केली. फर्म मालकाने अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. तक्रारदारांने विकास सोनवणे बरोबर चर्चा सुरू ठेवली. यातून ४५ हजार रुपये देण्या बाबत तोडपाणी झाले. या तडजोडीनुसार विकास सोनवणे यांना ४५ हजाराची लाच घेताना पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, अप्पर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाने पोलिस निरीक्षक बापू साळुंके, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, पो.हे.कॉ. विकास माने , सुनील घोसाळकर, पो. ना . सचिन पाटील सुधीर पाटील, संगीता गावडे, प्रशांत दावणे यांनी केली.