जुलूसवर कायमच्या बंदीची मागणी! गोव्यात हिंदू संघटनेच्या विरोधात मुस्लिम समाज आक्रमक, म्हापशात तणाव!!
म्हापसा :– काणकोणात मुस्लिम समाजाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या जुलूसवर कायमच्या बंदीची मागणी हिंदू संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावरुन गोव्यातील मुस्लिम समाज आक्रमक झाला असून, म्हापशात शनिवारी (२८ सप्टेंबर) रात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली. संतप्त जमावाने सम्राट भगत विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.*
राज्यातील जातीय सलोखा बिघडविण्याचे वक्तव्य केल्याचा आरोप मुस्लिम समुदायाने करत म्हापसा पोलिस स्थानकासमोर एकत्र येण्यास सुरुवात केली. जमावाने सम्राट भगत याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी करत गोंधळ घातला. पोलिस स्थानक परिसरात शंभरहून अधिक संख्येने एकत्र आलेल्या जमावामुळे काही काळ स्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने सम्राट भगत आणि इतरांनी एकत्र येत २६ सप्टेंबर रोजी काणकोण येथे बेकायदेशीर जमाव गोळा करुन द्वेष पसरविणाऱ्या भाषण दिले. तसेच, मुस्लिम समाजाच्या भावना दुखवतील अशा प्रकारचे वक्तव्य करुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मुस्लिम समुदायाने केला. याप्रकरणी भगत विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी समुदायाने केली.
काणकोणातील याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुस्लिम समुदायातील नागरिक आक्रमक झाले.
काय आहे प्रकरण?
हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने काणकोण येथे जमाव गोळा करुन द्वेषपूर्ण भाषण केल्याचा मुस्लिम समुदायाने आरोप केला आहे. मुस्लिमांच्या जुलूसवर कायमची बंदी घालण्याची मागणी यावेळी करण्यात आल्याचा आरोप देखील केला जात आहे.
दरम्यान, मुस्लिम समुदायाने कारवाईची मागणी केल्यानंतर हिंदवी स्वराज्य संघटनेच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.