लोकांच्या भावना इमारतीच्या कणाकणात, नाट्यगृह पुन्हा दीड वर्षात दिमाखात उभं राहिल – पालकमंत्री हसन मुश्रीफ

लोकांच्या भावना इमारतीच्या कणाकणात, नाट्यगृह पुन्हा दीड वर्षात दिमाखात उभं राहिल – पालकमंत्री हसन मुश्रीफ

लोकांच्या भावना इमारतीच्या कणाकणात, नाट्यगृह पुन्हा दीड वर्षात दिमाखात उभं राहिल – पालकमंत्री हसन मुश्रीफ

नाट्यगृहाच्या दुरूस्तीला तातडीने सुरूवात झाल्याचे समाधान – छत्रपती शाहू महाराज

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी कामास उगवत्या सुर्याच्या साक्षीने प्रारंभ

कोल्हापूर, दि. 14 : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह 8 ऑगस्ट 2024 रोजी आगीच्या दुर्देवी घटनेत जळाले, हा दिवस अतिशय वाईट दिवस ठरला असे सांगून पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, नाट्यगृहाची इमारत जरी दगड, विटा, सिमेंट, लाकडाने उभी असली तरी त्यामध्ये लोकांच्या भावना इमारतीच्या कणाकणात रूजलेल्या आहेत. असे हे नाट्यगृह पुन्हा दीड वर्षात दिमाखात उभं राहील. दि.14 ऑक्टोबर च्या सकाळी उगवत्या सुर्याच्या साक्षीने सात वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ व खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्याहस्ते कोल्हापूर येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अति.आयुक्त राहूल रोकडे, माजी नगरसेवक आदिल फरास, सिने अभिनेते आनंद काळे, व्ही बी पाटील, ठेकेदार वेणुगोपाल, श्रीनिवासन, चेतन रायकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरीक, नाट्यकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भूमिपूजन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वांनी नाट्यगृहास भेट देवून हळहळ व्यक्त केली. हे काम लवकर व्हावं, अशा सर्वांच्या भावना होत्या. खासदार छत्रपती शाहू महाराज यांनीही चांगला पाठपुरावा केला. महापालिकेकडून 8 ऑगस्ट नंतर काय काय प्रक्रिया राबविण्यात आली याचा घटनाक्रम लोकांसमोर ठेवला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने 25.10 कोटी रूपये निधी दिला. तसेच तो कमीही पडणार नाही, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुर्वीसारखेच उभे राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. रेकॉर्ड ब्रेक गतीने कामाच्या सर्व प्रक्रिया राबवून प्रशासनाने चांगले काम केल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले, कोल्हापूर शहरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह दुर्देवी आगीच्या घटनेत जळून खाक झाले. नाट्यगृह पुन्हा उभारणीचे काम अतिशय जलद आणि वेळेत सुरु होत आहे याचे समाधान आहे. सर्वांच्या भावना घेवून हे काम पुढे जाईल आणि दीड वर्षाच्या आत नाट्यगृहात पुन्हा कार्यक्रमांना सुरुवात होईल. पुनर्बांधणीसाठी स्थापन केलेल्या सुकाणु समितीने चांगली साथ दिल्याचे सांगून सर्वांनी लक्ष दिल्यानेच हे नाट्यगृह उभारणीचे काम गतीने सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले. नाट्यगृहाची इमारत शासनाची असून तिची जबाबदारी त्यांनी प्राधान्याने घ्यावी असेही ते पुढे म्हणाले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, कार्यकारी अध्यक्ष तसेच सर्व कोल्हापूरकर यांच्या सहकार्याने नाट्यगृह उभारणीचा पहिला टप्पा सुरु करतोय ही आनंदाची बाब असल्याचे सांगितले. हे काम लवकरात लवकर होईल अशी ग्वाही देवून पुढील कामेही वेळेतच होतील असे सांगितले. महानगरपालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी प्रास्ताविकात आचारसंहितेत काम थांबायला नको म्हणून सर्व प्रक्रिया गतीने राबविली असल्याचे सांगून कोल्हापूरवासियांच्या भावना व मुख्यमंत्री व खासदार यांच्या पाठपुराव्याने तातडीने काम सुरु होत असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, पालकमंत्री, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, तसेच इतर लोकप्रिनिधींनी प्रत्येक अडचणीत सहकार्य केले. निवडण्यात आलेला पुरवठादार अनुभवी असून आम्ही सर्व प्रक्रिया पारदर्शकतेने पुढे नेवू असे सांगितले. यावेळी उपस्थित कलाकार व नाट्यकर्मींनी वेळेत काम सुरु केल्याबद्दल मान्यवरांचा सत्कार केला. आभार प्रदर्शन अति. आयुक्त राहुल रोकडे यांनी मानले तर विजय वनकुद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुभेच्छा संदेश
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह इमारत नुतनीकरण कार्यक्रमास मनापासून शुभेच्छा देतो. कोल्हापूर शहरासोबतच जिल्ह्याचे सांस्कृतिक केंद्र अशी ओळख असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाटयगृह इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या दुर्दैवी घटनेनंतर मी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी दृष्य बघून मन हेलावून गेले. प्रत्यक्ष पाहणीनंतर आम्ही तातडीने दखल घेऊन नाट्यगृह पुर्नबांधणीसाठी २५.१० कोटींचा निधी मंजूर केला. त्यानुसार पुन्हा नव्या दिमाखात केशवराव भोसले नाट्यगृह उभे करत आहोत. नागरीकांच्या व नाट्यप्रेमी, कलाकारांच्या भावना विचारात घेऊन या नाट्यगृहाची पुनर्बांधणी करत आहोत. कोल्हापूर शहरात एक ऐतिहासिक लौकिकाला साजेशी नाट्यगृहाची इमारत उभी राहील असा मला विश्वास आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शुभेच्छा संदेश
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह इमारतीला आग लागून दुर्दैवी घटना घडली होती. नंतर शासनाने पुर्नबांधणीसाठी रुपये २५.१० कोटी निधी मंजूर केलेला आहे. महापालिकेच्या प्रशासनाने याबाबतची निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण केली असून केशवराव भोसले नाट्यगृह नव्याने उभारण्यासाठीच्या कामाचा शुभारंभ होत आहे. लवकरच ती वास्तू दिमाखात उभी राहून पुन्हा नाट्यरसिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल अशी मला खात्री आहे.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *