अशी कौतुकाची थाप निवडणूक आयोगाने मिळवली पाहिजे.
महाराष्ट्रात विधानसभेचे प्रचाराचे वारे जोरात वाहत असून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी काय थैमान घातले आहे हे रोज दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांमधून दिसून येत आहे. जाहीर सभांमधून बोलताना अनेक नेत्यांची जीभ घसरत आहेत . सार्वजनिक सभेत बोलू नये ती भाषा हे लोक सातत्याने वापरत आहेत. परवा खासदार धनंजय महाडिक यांचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. काँग्रेसच्या प्रचारयात्रेत दिसणार्या महिलांचे फोटो काढा आणि आमच्याकडे पाठवा, आमचे पंधराशे रुपये घेतात आणि विरोधी पक्षांच्या प्रचाराला ज्या महिला जातात त्या महिलांना धडा शिकवण्याची भाषा तिथे केली गेली. सुदैवाने या गंभीर आक्षेपार्ह वक्तव्याची निवडणूक आयोगाने तात्काळ दखल घेतली हे बरे झाले. वास्तविक असे वक्तव्य करणार्या नेत्यावर प्रचारबंदी घालण्याची तरतूद किंवा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे.
महाडिक यांना केवळ नोटीस बजावून व गुन्हा दाखल करून काम भागणार नव्हते, तर त्यांच्यावर तातडीने प्रचारबंदी लागू करायला हवी होती. , तर बाकीचेही बरेच गैरप्रकार महाराष्ट्रात सध्या पाहायला मिळत आहेत. गाड्यांमधून कोट्यवधी रुपयांची रोकड मिळते आहे. जाहीर झालेली रक्कम आणि प्रत्यक्षात जप्त केलेली रक्कम याच्यात तफावत असल्याच्याही कानगोष्टी सुरू आहेत. निवडणूक पूर्ण निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पाडणे ही सर्वस्वी आयोगाचीच जबाबदारी आहे. नंतर कुठल्याही तक्रारीला जागा राहणार नाही याची काळजी त्यांनी आधीपासूनच घेणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रातल्या या निवडणुकीचा निकाल जो काही यायचा आहे तो येवो, पण महाराष्ट्रातील निवडणूक अत्यंत निष्पक्षपणे पार पडली, अशी कौतुकाची थाप निवडणूक आयोगाने मिळवली पाहिजे.
मेहबूब सर्जेखान ( ज्येष्ट पत्रकार )
पुणे