कपिल पाटील यांच्या राज्यभर बैठका

कपिल पाटील यांच्या राज्यभर बैठका

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :
महाराष्ट्रातील समाजवादी कामगार संघटना, सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना यांच्या प्रतिनिधींच्या आणि समाजवादी कार्यकर्त्यांच्या राज्यभर बैठका घेण्यासाठी माजी आमदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

पोस्टल बॅलेटमधून मतदान करण्याचे आणि 20 नोव्हेंबर रोजी मतदानादिवशी कुटुंबीय, नातेवाईक यांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

कपिल पाटील आणि प्रमुख पदाधिकारी राज्यभर बैठका घेत आहेत. काँग्रेस पक्ष, काँग्रेस पुरस्कृत आणि महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात समाजवादी विचारांची 7 टक्के मते आहेत. ही मते कपिल पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे काँग्रेसकडे पर्यायाने महाविकास आघाडीकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे.


कंत्राटीकरण, नवीन पेन्शन यातून होणारं शोषण आणि नाकारलेले हक्क याविरोधात लढण्यासाठी
काँग्रेस पक्ष, काँग्रेस पुरस्कृत आणि महाविकास आघाडीला मतदान करण्याचे
कामगार, कर्मचारी आणि शिक्षक यांना आवाहन

जिंदाबाद !
देशात आर्थिक विषमता आणि गरीबी इतकी वाढली आहे जितकी पूर्वी कधीच नव्हती. जीवनमानात घट झाली आहे. बेरोजगारी वाढत आहे. कष्टकऱ्यांच्या श्रमाचे मूल्य घटले आहे. शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. दुसरीकडे नथुरामी फॅसिझमच्या ताकदी वाढत आहेत. अशा परिस्थितीत शिव छत्रपतींच्या महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर आणि गांधीजी यांना मानणारे मूकदर्शक राहू शकत नाहीत.

माननीय श्री राहुल गांधी यांनी देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एक लढाई सुरू केली आहे. नव्वद टक्के लोक व्यवस्थेबाहेर बसलेले आहेत. त्यांच्यासाठी राहुलजी जातीय जनगणनेची मागणी करत आहेत. मागासलेले आणि वंचित वर्गाच्या सहभागाची चर्चा करत आहेत. दलित, ओबीसी, आदिवासी आणि इतर सर्वसाधारण जातींसाठी आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा राहुल गांधी वाढवू इच्छितात.

जे विचार डॉ. राम मनोहर लोहिया मांडत होते, तेच विचार आता राहुल गांधी यांच्या कृतीत दिसत आहेत. समाजवादाचा झेंडा आणि अजेंडा राहुलजींनी उचलला आहे. फुले, शाहू, आंबेडकर, गांधी, टागोर, पेरियार यांच्या विचारांचा समन्वय राहुल गांधी यांच्या प्रयत्नात दिसत आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कंत्राटीकरण, नवीन पेन्शन यातून होणारं शोषण आणि नाकारलेले हक्क याविरोधात लढण्यासाठी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पुरस्कृत आणि महाविकास आघाडीला मतदान करण्याचे कामगार, कर्मचारी आणि शिक्षक यांना मी आवाहन करत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *