संविधानाची तत्त्वसाक्षरता वृद्धिंगत झाली पाहिजे -प्रसाद कुलकर्णी यांचे मत

संविधानाची तत्त्वसाक्षरता वृद्धिंगत झाली पाहिजे -प्रसाद कुलकर्णी यांचे मत

संविधानाची तत्त्वसाक्षरता वृद्धिंगत झाली पाहिजे

प्रसाद कुलकर्णी यांचे मत

कुरुंदवाड ता.१ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा समाज सुधारणावाद, भारतीय संस्कृतीतील मानवतावाद,भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील लोकशाही आणि उदारमतवादी विचारधारा, महात्मा गांधी यांची विचारधारा आणि पंडित नेहरूंचा समाजवाद अशा विविध प्रवाहांचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर नैसर्गिकपणे पडलेला आहे. त्यामुळे संविधानाच्या प्रस्ताविकेतील प्रत्येक शब्दाशी स्वतः सुसंगत वर्तन व्यवहार करून त्यासाठी आग्रही राहिले पाहिजे. संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने जगातील महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज असलेल्या भारतीय संविधानाच्या विचाराचे अमृततत्त्व लोकमानसात रुजवण्यासाठी आणि संविधानाची तत्त्वसाक्षरता वृद्धिंगत करण्यासाठी सतत कार्यरत राहणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असून ती आपली राष्ट्रीय बांधिलकी आहे आणि तेच खरे देशप्रेम आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते येथील साधना मंडळाच्या वतीने संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त कुरुंदवाड येथील प्रबुद्धभारत नगरमध्ये आयोजित जाहीर व्याख्यानात ‘ ‘भारतीय संविधान ‘ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी साधना मंडळाचे अध्यक्ष स.ग.सुभेदार होते.त्यांनीसर्वांचेस्वागतकेले.प्रा.विठ्ठल शिंगे यांनी प्रास्तविक केले.पाहुण्यांचा परिचय गौतम ढाले यांनी करून दिला. प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवर वेटलिफ्टिंग स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या तरुणांचा प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले,समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे.तसेच संविधान मंजूर होत असताना हे संविधान केवळ राजकीय समता प्रस्थापित करेल पण सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापनेसाठी सत्ताधाऱ्यांना तशी धोरणे राबवावी लागतील याची जाणीव करून दिलेली होती. आज पंच्याहत्तर वर्षानंतर सर्व क्षेत्रातील विषमता वाढताना दिसत आहे. आहे रे व नाही रे वर्गातील अंतर फार वेगाने वाढत आहे. आम्ही संविधान बदलणार असे जाहीर विधाने करणारे मोकाटपणे फिरत आहेत.त्यांना जाब न विचारता उलट संरक्षण दिले जाते व पाठीशी घातले जात आहे. संविधानाच्या मूल्यांना पायदळी तुडवले गेले की संविधान
धोक्यात आले आहे असे कोणी म्हटले तर त्याला विरोध करणारी झुंडशाही फोफावते आहे. राज्यकर्त्यांची संविधानाप्रती बांधिलकी केवळ शाब्दिक असून चालत नसते तर ती धोरणांच्या अंमलबजावणीतून आली पाहिजे. संविधानाच्या तत्त्वज्ञानाविषयी प्रेम, आस्था,जिव्हाळा बेगडी असेल तर ती राष्ट्रीय प्रसारणा ठरेल.
बाबासाहेबांनी स्वातंत्र्याच्या आधी वीस वर्षे विषमतावादी मनुस्मृती जाहीरपणे जाळून त्याची कारणे स्पष्ट केली होती. आणि स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांनी संविधानाचे शिल्पकार होत आपल्या देशाला समतेच्या, एकतेच्या दिशेने नेणारी राज्यघटना दिली होती. त्या घटनेतील मूल्य प्राणपणाने जपणे ही यामृत महोत्सवी वर्षातील आपली महत्वपूर्ण जबाबदारी आहे. कारण संविधानाच्या चौकटीत राहून संविधान खिळखिळे करण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. अशावेळी संविधानाच्या तत्त्वज्ञानाची बांधिलकी मानणाऱ्या प्रत्येकाने राजकीय, सामाजिक ,आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करणारी भूमिका संघटितपणे घेण्याची गरज आहे. प्रसाद प्रकरणी यांनी सव्वा तासाच्या आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात भारतीय संविधान ,त्याची निर्मिती , त्याचे तत्त्वज्ञान व वाटचाल आणि महत्व विशद केले.आभार प्रा. संतोष जोगळे यांनी केले. सूत्रसंचालन महेश घोटणे यांनी केले. यावेळी बाबासाहेब नदाफ,जयपाल बलवान, डॉ.एस.के.माने,माजी प्राचार्य.सावगावे,हेमंत आवटे,सच्चिदानंद आवटी, साहिल शेख, जे. पी. जाधव, कडाळे सर यांच्यासह साधना मंडळा ,राष्ट्र सेवा दल ,प्रबुद्ध भारत मंडळ यांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *