प
18 मार्च रोजी मुंबई आझाद मैदानावर हजारो बांधकाम कामगारांचे तीव्र आंदोलन!
मुंबई, 11 मार्च 2025 – महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने 18 मार्च रोजी सकाळी 10 वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे दोन वर्षांपूर्वी 25,000 कोटी रुपये शिल्लक होते. मात्र, या निधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत असून, वस्तुरूप लाभांच्या नावाखाली तब्बल 15,000 कोटी रुपये खर्च झाले. या संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कल्याणकारी मंडळाचे सोशल ऑडिट बंधनकारक आहे. मात्र, महाराष्ट्रात हे ऑडिट खाजगी कंत्राटदारांमार्फत करून गैरव्यवहार लपवला जात आहे. सन 2023-24 मध्ये एकूण 5,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले, त्यापैकी पोषण आहारासाठी 2,014 कोटी, सुरक्षा भांड्यांसाठी 500 कोटी आणि सुरक्षा संचासाठी 500 कोटी रुपये इतका खर्च झाला. मात्र, प्रत्यक्ष कामगारांच्या हितासाठी फक्त 614 कोटी रुपये खर्च झाले, तर व्यवस्थापनासाठी तब्बल 335 कोटी रुपये वापरण्यात आले.
सध्या 30 लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत, त्यामुळे त्यांना कोणताही लाभ मिळत नाही. मंडळाची ऑनलाइन यंत्रणाही पूर्णतः कोलमडली आहे. महाराष्ट्र शासनाने 9 सप्टेंबर 2014 रोजी दिलेल्या आदेशानुसार एका महिन्यात अर्ज मंजूर करून जाहीर करावेत, अशीही संघटनेची प्रमुख मागणी आहे.
प्रमुख मागण्या:
बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना सुरू करावी.
बांधकाम कामगारांना राज्य कामगार विमा योजना लागू करावी.
बांधकाम कामगारांच्या घरांसाठी शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी.
बांधकाम कामगारांसाठी प्रभावी गृहनिर्माण योजना राबवावी.
या सर्व मागण्यांसाठी महाराष्ट्रातील हजारो बांधकाम कामगारांनी 18 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे राज्य निमंत्रक ज्येष्ठ कामगार नेते कॉ. शंकर पुजारी यांनी केले आहे.
स