
धायरी (प्रतिनिधी)
एशियन अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर संचलित एशियन महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत “लिंग समानता आणि आर्थिक विकासात महिलांची भूमिका” या विषयावर बोलताना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि वक्त्या रिता इंडिया फाउंडेशन च्या संस्थापिका डॉ. रिता मदनलाल शेटीया, म्हणाल्या अजूनही लिंग समानता आलेली नाही यासाठी गरज आहे ती स्री ही पुरुषाने एकमेकांना समजून घेत, रूढी आणि परंपरा या चक्रव्यूहातून बाहेर पडत दोघांनी एक माणूस म्हणून एकमेकांना जगू दिले पाहिजे , त्यासाठी संविधानेने दिलेले अधिकार, वेळ पडेल तेव्हा आवाज उठविला पाहिजे , व्यक्ती स्वतंत्र याचा वापर प्रत्येक महिलेने करायला हवा. यासंबंधित काही चित्रफित दाखवून प्रत्यक्षात याचा वापर कसा करावा याद्वारे दाखवण्यात आले. तसेच आर्थिक विकासात आज महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची असून यावेळेस च्या अर्थसंकल्पात ही चार स्तंभा मध्ये महिलांचा उल्लेख केला आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी आणायची असेल तर महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे.
संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. अनिता सापटे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते एक यशस्वी उद्योजिका हा प्रवास आणि यशस्वी संघर्ष सांगत, काम मागणारे होण्यापेक्षा काम देणारे ( उद्योजक) बना असे सांगितले.
यावेळी ” लाडकी बहीण योजना” योग्य की अयोग्य या विषयावरील वादविवाद स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ , सावित्री बाई फुले, सिंधू ताई सपकाळ आणि इतर कर्तृत्ववान महिलांचा पेहराव परिधान करून त्यांचे विचार व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सविता सिंग, फार्मसी विभाग प्राचार्य प्राप्ती देसाई , उपप्राचार्य शिंदे आणि श्रुती रेगे, एशियन महाविद्यालय वेल्हे प्राचार्य स्वाती काळे, संस्थेचे उपाध्यक्ष आनंद सापटे, श्री. अनिल सापटे आणि उत्कर्ष सापटे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका शरयू यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर प्राध्यापक आणि कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.