शिरोळचे डॉ दगडू माने यांचा आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरव
— मुंबई येथे जनहित फाउंडेशन संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
मुंबई येथील जनहित फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिरोळ येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू श्रीपती माने यांना ‘ उत्कृष्ट पत्रकार ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई (दादर) येथे अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या मांगल्य सभागृहात मान्यवरांच्या हस्ते डॉ माने यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक – अध्यक्ष संतोष आठवले होते.
डॉ दगडू माने यांनी पत्रकारिता आणि लोकसेवेच्या कार्यात तीन दशकांहून अधिक काळ उत्कृष्ट काम केले आहे. जनतेच्या हितासाठी चळवळीचा आवाज बनून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असून गोरगरीब ,उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी त्यांचा लढवय्या स्वभाव समाजाला प्रेरणादायी असल्याने जनहित फाउंडेशनने डॉ माने यांचा विशेष सन्मान केला.
यावेळी सामाजिक चळवळीचे नेते संतोष आठवले, निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी जनहित फाउंडेशन संस्था ही सामाजिक चळवळ गतीमान करीत असून संविधान आणि लोकशाही बळकट करण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या लढ्याला सर्वांनीच पाठबळ देण्याची गरज असल्याचे सांगून क्रांती घडविण्याचे सामर्थ्य असणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा सन्मान म्हणजे समाजाला भूषणावह असल्याचे सांगितले.
या समारंभास निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी अजित देशमुख, आकाशवाणीच्या निवृत निवेदिका इंदुमती पेठे, डॉ ऋजुता ओमप्रकाश दुबे, राजेंद्र लकेश्री , मधुवंती पेठे , राजेंद्र प्रधान , संदीप माने ( पेंटर ), दिवाण कोळी, अनिलराव लोंढे , निलेश देवमाने यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष उमेश जामसंडेकर, सचिव महेन्द्र वाघमारे उपस्थित होते.