अवयव दान : अमूल्य जीवनदानाचा संकल्प

अवयव दान : अमूल्य जीवनदानाचा संकल्प

अवयव दान : अमूल्य जीवनदानाचा संकल्प

अवयव दान म्हणजे मृत्यूनंतर किंवा जिवंत असताना दुसऱ्या गरजू व्यक्तीसाठी अवयव विनामूल्य देणे. हे एक सामाजिक आणि मानवतावादी कार्य असून, अनेक लोकांच्या जीवनात नवसंजीवनी देण्याचे सामर्थ्य अवयव दानात आहे. भारतासह संपूर्ण जगभरात अवयव दानाबाबत जागरूकता वाढविण्याची आवश्यकता सद्या जाणवत आहे.
अवयव दानाचे महत्त्व –
आज अनेक लोक विविध अवयवांच्या निकामी होण्यामुळे मृत्यूच्या छायेखाली जगत आहेत. अवयव दानामुळे अशा रुग्णांना नवीन जीवन मिळू शकते. हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे, स्वादुपिंड, नेत्र, त्वचा आणि काही ऊती (टिश्यू) दान करून गरजू रुग्णांचे प्राण वाचवता येतात.
अवयव दान दोन प्रकारचे केले जाऊ शकते.
जिवंत दान आणि मृत्यूनंतरचे दान अशाप्रकारे व्यक्ती अवयव दान करू शकते.

  1. जिवंत दान (Living Donation)
    या प्रकारात, जिवंत व्यक्ती स्वतःच्या शरीरातील पुनरुत्पादक किंवा एकाच्या जागी दुसरा असू शकणारा अवयव दान करू शकते.
    मूत्रपिंड (Kidney) – प्रत्येक व्यक्तीकडे दोन मूत्रपिंडे असतात. एक मूत्रपिंड दान करूनही व्यक्ती सामान्य आयुष्य जगू शकते.
    यकृताचा भाग (Liver Lobe) – यकृताचा काही भाग दान केल्यास, तो काही कालावधीत पुनरुत्पन्न होतो.
    हाडांचा मज्जारस (Bone Marrow) – ल्युकेमिया किंवा इतर रक्तविकार असलेल्या रुग्णांसाठी आवश्यक असतो.
  2. मृत्यूनंतरचे दान (Deceased Donation)-
    मृत्यूनंतर विविध अवयव दान करता येतात, ज्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात.
    हृदय (Heart) – मृत्यूनंतर केवळ मेंदूमृत्यू (ब्रेन डेड) झालेल्या व्यक्तीकडूनच दान करता येते.
    यकृत (Liver) – मेंदूमृत्यू झालेल्या किंवा हृदय थांबल्यानंतर त्वरित दान करता येते.
    फुफ्फुसे (Lungs) – मेंदूमृत्यू झालेल्या रुग्णांकडून दान करता येतात.
    नेत्र (कॉर्निया) – हृदय थांबल्यानंतर काही तासांत दान करता येते.
    त्वचा व हाडे – हृदय बंद पडल्यावरही काही वेळानंतर दान करता येतात.
    अवयव दान करण्याची प्रक्रिया –
  3. नोंदणी प्रक्रिया –
    अवयव दान करण्यासाठी व्यक्तीने स्वेच्छेने नोंदणी करावी लागते.
    भारतात ‘राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्था’ (NOTTO) तसेच विविध राज्यस्तरीय आणि हॉस्पिटल्सशी संलग्न संस्था यासाठी कार्यरत आहेत.
    दात्याने मृत्यूपूर्वी संमती दिली नसली तरी, त्याच्या कुटुंबीयांची संमती घेऊन दान करण्याची प्रक्रिया केली जाते.
  4. मेंदूमृत्यू (ब्रेनडेड) प्रमाणपत्र –
    मृत्यूनंतर अवयव दान करण्यासाठी मेंदूमृत्यू झाल्याचे अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असते.
    मेंदूमृत्यू झाल्यानंतर त्वरित अवयव काढले जातात, कारण प्रत्येक अवयवाचा विशिष्ट वेळेत प्रत्यारोपण होणे गरजेचे असते.
    3.अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया –
    गरजू रुग्णांची नोंद NOTTO किंवा संबंधित संस्थांमध्ये असते.
    दात्याच्या अवयवांची तपासणी करून जुळणाऱ्या रुग्णाला ते प्रत्यारोपित केले जातात. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली पार पडते.
    एक अवयवदाता अनेकांना जीवनदान देऊ शकतो. अवयव दानामुळे समाजात सकारात्मक बदल होण्यास मदत होतेच सोबत लोकांमध्ये सहकार्य आणि सेवा वृत्ती वाढीस लागण्यास देखील मदत होते. वैद्यकीय क्षेत्राचा विकास साधला जाऊन प्रत्यारोपण तंत्रज्ञान सुधारण्यास मदत होते. अवयव दान हे एक महान कार्य असून, प्रत्येकाने त्याबाबत जागरूक होणे आवश्यक आहे. आपल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो, ही संकल्पना अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी अवयव दानाचा संकल्प करून, समाजासाठी हे मोठे योगदान द्यावे.

सौ. वर्षा सूर्यकांत मस्के
उपक्रमशील शिक्षिका,
ताराराणी विद्यापीठाचे उषाराजे हायस्कूल,
कोल्हापूर.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *