भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कोल्हापूर विमानतळावर उत्साहात स्वागत

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कोल्हापूर विमानतळावर उत्साहात स्वागत
   कोल्हापूर दि. १६ ऑगस्ट :भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज कोल्हापूर विमानतळावर ६ वाजता आगमन झाले. कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा असणाऱ्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी ते कोल्हापूरला आले आहेत. यावेळी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

उद्या दुपारी तीन वाजता भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याहस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाऊसिंगजी मार्गावरील छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल ( सीपीआर ) समोरील ऐतिहासिक इमारतीमध्ये सर्किट बेंचचे उद्घाटन होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, छत्रपती संभाजी नगर व गोवा या खंडपीठानंतर राज्यात सोमवारपासून कोल्हापूर सर्किट बेंच येथे न्यायदानाचा शुभारंभ होणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील नागरिकांचा न्यायदानाच्या प्रक्रियेतील वेळ, पैसा, श्रम यामुळे कमी होणार आहे.

   महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम होत आहे. आज विमानतळावर सरन्यायाधीशांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. सरन्यायाधीशांनी व्यक्तिगतरीत्या सर्वांशी संवाद करत स्वागताचा स्वीकार केला. कोल्हापूर सर्किट बेंच साठी मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्ती केलेले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक,न्यायमूर्ती शिवकुमार दिगे,न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी त्यांचे प्रथम स्वागत केले.यावेळी विधीक्षेत्रातील अन्य मान्यवरही उपस्थित होते. 

त्यानंतर त्यांच्या स्वागताला खासदार शाहू महाराज छत्रपती, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्याचे ग्राहक तक्रार निवारण आयुक्तालयाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे, आ.सतेज पाटील, आ. जयंत आसगावकर, आ.विनय कोरे, आ.अमल महाडिक, आ.अशोकराव माने, आ.राहुल आवाडे, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस., कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, यांनी त्यांचे यावेळी स्वागत केले.

विमानतळावरील स्वागतानंतर सरन्यायाधीशांचा ताफा थेट राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी निघाला.ताराराणी चौकामध्येही त्यांचे स्वागत करण्यात आले.

  भारताचे सरन्यायाधीश उद्याच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आले असून उद्या तीन वाजता सर्किट बेंचचे अधिकृत उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व सर्किट बेंचचे न्यायमूर्ती एम. जे. कर्णिक उपस्थित राहणार आहेत.उद्घाटनाचा ऐतिहासिक सोहळा मेरी वेदर मैदानावर होणार आहे.

0000

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *