वंचित बहुजन आघाडी, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने प्रज्ञा कांबळे न्याय हक्क निर्धार मोर्चाचे आयोजन
कोल्हापूर: भोगावती महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रज्ञा दशरथ कांबळे (रा. राधानगरी, जि. कोल्हापूर) हिच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासातील गंभीर त्रुटींविरोधात आणि दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने भव्य ‘न्याय हक्क निर्धार मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे.
प्रज्ञा कांबळे ही २४ जुलै २०२५ रोजी कॉलेज सुटल्यानंतर एसटी बसची वाट पाहत असताना, काही हुल्लडबाज मुलांनी जाणून-बुजून भरधाव कारने तिला धडक देऊन फरपटत नेले होते. या घटनेनंतर कॉलेजमधील शिक्षक व एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने पाठलाग करून आरोपीला पकडले होते. मात्र, या गंभीर घटनेतील आरोपीस योग्य कायदेशीर कलम न लावता जुजबी कलम लावून पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासनावर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे.
मोर्चाचा तपशील:
- दिनांक: २८ ऑक्टोबर २०२५
- वेळ: सकाळी ठीक ११.०० वाजता
- प्रारंभ: माननीय जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर (येथे निवेदन देण्यात येईल).
- मार्ग: जिल्हाधिकारी कार्यालय ते बालाजी गार्डन, एम.एस.ई.बी. ऑफिस, आरटीओ ऑफिस, गोकुळ संघ मार्गे पोलीस महानिरीक्षक कार्यालय.
- मागणी: प्रज्ञा कांबळे मृत्यू प्रकरणातील तपासातील त्रुटी दूर करून दोषींवर कठोर कारवाई करणे आणि आरोपीला पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासनावर कारवाई करणे.
या मोर्चात प्रज्ञा कांबळे यांच्या कुटुंबासह सर्व सामाजिक संघटना, विद्यार्थी, महिला आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि प्रज्ञा कांबळेला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज बुलंद करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.
न्यायासाठी चला, प्रज्ञा कांबळेला न्याय मिळवूया!
फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार जपणारे विचारवंत आणि कार्यकर्त्यांनी या न्याय हक्क निर्धार मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.