फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडितेच्या कुटुंबीयांशी संवाद साधत दिले न्यायाचे आश्वासन

फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडितेच्या कुटुंबीयांशी संवाद साधत दिले न्यायाचे आश्वासन

सातारा, (विशेष प्रतिनिधी उदय नरे :
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने (Phaltan Doctor Case) संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या प्रकरणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधून त्यांना सांत्वन दिले तसेच न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

डॉ. गोऱ्हे यांनी या संवादादरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांची वेदना जाणून घेतली व सांगितले की, “ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी आवश्यक त्या सर्व स्तरांवर पाठपुरावा केला जाईल.”

त्या पुढे म्हणाल्या की, “मी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच फलटण व साताऱ्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेणार आहे. पीडितेने केलेल्या लेखी तक्रारीवर कोणती कारवाई झाली याची सखोल चौकशी केली जाईल. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रताडना प्रतिबंध समितीने’ कोणती पावले उचलली, हे देखील तपासले जाईल.”

डॉ. गोऱ्हे यांनी पुढे स्पष्ट केले की, “पीडित कुटुंबीयांची मागणी बीड न्यायालयात खटला चालवण्याची असल्यास, त्याबाबत विधी व न्याय विभागाशी तसेच उच्च न्यायालयाशी आवश्यक चर्चा करून निर्णय घेता येईल. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विधी सचिवांनाही पत्र पाठवले जाईल.”

यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या संगीता चव्हाण, माजी आमदार गोविंद केंद्रे व केशव आंधळे यांच्याशीही डॉ. गोऱ्हे यांनी चर्चा केली. त्यांनी सर्व संबंधितांना न्यायप्रक्रिया वेगाने पार पाडावी आणि पीडित कुटुंबीयांना आधार मिळावा यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले.

डॉ. गोऱ्हे यांनी शेवटी पीडितेच्या कुटुंबीयांना दिलासा देत म्हटले की, “तुम्ही एकटे नाही, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. मुलगी अत्यंत हुशार आणि कर्तृत्ववान होती, तिच्या आत्म्यास शांती लाभो आणि न्याय मिळावा, हे आमचे कर्तव्य आहे.”

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *