प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा; एआय’ ही कामाला नवी धार देणारी सुविधा – मंत्री मंगलप्रभात लोढा

प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा; एआय’ ही कामाला नवी धार देणारी सुविधा – मंत्री मंगलप्रभात लोढा

📰 प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा
🤖 ‘एआय’ ही कामाला नवी धार देणारी सुविधा – मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे): प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता वापर आणि त्याचे महत्व लक्षात घेऊन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे पत्रकारांसाठी विशेष ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा हा नवा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत, कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
मुंबईतील कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद, राज्यभर उपक्रम नेण्याचा निर्णय
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने, ११ ते १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान मंत्रालयातील पत्रकार कक्षात चार दिवसीय एआय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत:

  • एआय साधनांचा पत्रकारितेसाठी वापर
  • वृत्ताची पडताळणी
  • माहिती शोधण्याची गती
  • डिजिटल कामकाजातील अचूकता आणि सुलभता
    यांसारख्या विषयांवर पत्रकारांना मार्गदर्शन मिळाले. या प्रशिक्षणाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन, हा उपक्रम आता जिल्हा व तालुका स्तरावर काम करणाऱ्या पत्रकारांना आधुनिक एआय साधनांची ओळख आणि त्यांचा वापर प्रत्यक्ष शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभर नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
    पत्रकारांना अधिक सक्षम बनवण्याचा उद्देश
    या निर्णयाबद्दल कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “आज प्रत्येक पत्रकारावर बातमीच्या वेगासोबतच तिची अचूकता टिकवण्याची जबाबदारी वाढली आहे. अशावेळी एआय ही केवळ तांत्रिक सुविधा नाही, तर कामास नवी धार देणारे साधन आहे. राज्यातील प्रत्येक पत्रकार अधिक सक्षम व्हावा, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या माध्यमातून पत्रकारांद्वारे जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील आणि हेच या उपक्रमाचे खरे यश ठरेल.”
    श्री. लोढा यांनी यावेळी राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे नमूद केले. तसेच, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात ‘एआय फॉर न्यूज’ या विषयाचा चार महिन्यांचा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या सूचनेबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
    कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, एआय तज्ज्ञ किशोर जशनानी, आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांच्यासह मान्यवर व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    प्रशिक्षण कार्यशाळेतील मुख्य विषय
    चार दिवसीय कार्यशाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जशनानी यांनी पुढील विषयांवर सखोल माहिती दिली:
  • कृत्रिम बुद्धिमत्ता वापरताना द्यायचे प्रॉम्प्ट
  • चॅट जीपीटीला असलेले पर्याय
  • पत्रकारितेसाठी इतर सहायक टूल्स बनविणे
  • फोटोवरून बातमी करणे आणि व्हिडिओ लेखन बनविणे
  • न्यूज रिपोर्ट बनविणे
  • प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडियासाठी बातमी लेखन
  • चॅट पीडीएफ चा वापर
    कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी ‘एआय’ कार्यशाळा पत्रकारांना त्यांच्या दैनंदिन कामात अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते सहभागी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. पत्रकार दीपक कैतके, संजय जोग, क्लारा लुईस यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
    समारोप कार्यक्रमातील उपस्थिती
    कार्यक्रमास रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, एआय तज्ज्ञ किशोर जशनानी, उपकुलसचिव राजेंद्र तलवारे, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दिपक भातुसे, प्रशिक्षक लोमेश नारखेडे, सल्लागार गजानन हेगडे, वरिष्ठ सल्लागार आशिष श्रीवास्तव, प्रशासकीय सहाय्यक ऋषी देठे, शॉर्ट टर्म कोर्सेसचे शुभम शेंडे, श्रावणी कोचरे, भूषण पवार तसेच प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते.
    मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सरचिटणीस दीपक भातुसे यांनी सूत्रसंचालन केले, तर कार्यकारिणी सदस्य खंडूराज गायकवाड यांनी कार्यक्रमाचे समन्वय केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *