सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलन स्मृती जागर: इचलकरंजीत ‘साहित्यिकांच्या सहवासात’ कार्यक्रमाची रंगत!
इचलकरंजी (वार्ताहर): महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सन १९७४ मध्ये इचलकरंजीत झालेल्या सुवर्ण महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सुवर्ण महोत्सवी स्मृतीजागर इचलकरंजीकर मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. गेली अकरा महिने साहित्य, संगीत आणि कला क्षेत्रातील छोटी-छोटी अकरा संमेलने घेऊन हा स्मृतीजागर साजरा करण्याची खास ओळख इचलकरंजीकरांनी जपली आहे. याच शृंखलेतील ११ वे पुष्प नुकतेच गुंफण्यात आले, ज्यात ज्येष्ठ कवी आणि नामवंत वक्ते प्रा. अशोक दास यांनी आपल्या स्मृतींना उजाळा दिला.
‘इचलकरंजीची सांस्कृतिक महत्ता अद्वितीय’
’साहित्यिकांच्या सहवासात’ या विषयावर बोलताना प्रा. अशोक दास यांनी इचलकरंजी शहराची साहित्य, संस्कृती आणि कला क्षेत्रातील खास प्रतिमा अधोरेखित केली. ते म्हणाले, “या शहरात पाचही मंगेशकर भावंडांसह निरनिराळ्या क्षेत्रातील दिग्गज कार्यक्रमासाठी येऊन गेले व आजही येतात. पु. ल. देशपांडे, सुनीता देशपांडे, कुसुमाग्रज, कुंजबिहारी, बा. भ. बोरकर, वसंत बापट, द. मा. मिरासदार, मंगेश पाडगावकर, वसंत बापट आदी अनेक थोर साहित्यिकांचा सहवास इचलकरंजीमुळेच मलाही मिळू शकला.”
आपल्या ओघवत्या शैलीतील भाषणात प्रा. दास यांनी त्यांच्या विद्यार्थीदशेपासूनच्या आजवरच्या प्रवासातील साहित्यिकांच्या सहवासाच्या आठवणी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील बारकाव्यासह स्पष्ट केल्या. मोठ्या माणसांमधील साधेपणाच त्यांना मोठे करत असतो, हे त्यांनी आवर्जून सांगितले.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना आदरांजली
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी दिलीप शेंडे यांनी त्यांच्याबरोबर झालेल्या काही भेटींच्या आठवणी उलगडल्या.
हा स्मृतीजागर सोहळा दिलीप शेंडे यांच्या ‘स्वानंदी’ निवासस्थानी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. पी. मर्दा होते. त्यांनी आपल्या भाषणात पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्तित्वासह सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनाच्या आठवणींचा जागर केला. प्रा. रोहित शिंगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
उपस्थितांची मांदियाळी
या कार्यक्रमास जयप्रकाश शाळगावकर, काशिनाथ जगदाळे, दिपश्री शेंडे, वैशाली नायकवडे, अरुण दळवी, आरती लाटणे, रेखा पाटील, वैशाली राऊत, स्वाती गोंदकर, सुखदा देशपांडे, सुनीता कळंत्रे, श्वेता लांडे, बी. एम. पाटील, नागेश पाटील, गणेश टिके, रोहिणी कुलकर्णी, वैशाली मिराशी, विदुला नातू, शंकर उडपी, शिवाजी रेडेकर, विजय कुलकर्णी आदींसह साहित्य कला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसाद कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

