इचलकरंजी मनपा निवडणूक: पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचा भाजपा-महायुतीला जाहीर पाठिंबा
इचलकरंजी (प्रतिनिधी): इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, ‘पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना’ जिल्हा शाखेच्या वतीने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीस अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. पँथर आर्मीचे इचलकरंजी शहर अध्यक्ष. अक्षय कदम यांनी आमदार डॉ. राहुल आवाडे यांना पाठिंब्याचे अधिकृत पत्र सुपूर्द केले.

प्रभाग ३ मधील उमेदवारांना बळ
पँथर आर्मीच्या वतीने हा पाठिंबा प्रभाग क्रमांक ३ मधील महायुतीच्या उमेदवारांना देण्यात आला आहे. यामध्ये योगेश चांगदेव पाटील, सरिता भाऊसो आवळे, डॉ. प्रियांका प्रसाद इंगवले आणि राजू शंकर चव्हाण यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे प्रभाग ३ सह संपूर्ण शहरात महायुतीची ताकद वाढली असल्याचे मानले जात आहे.
विकासासाठी आणि कामगारांच्या हक्कासाठी कटीबद्धता
इचलकरंजी शहराचा सर्वांगीण विकास आणि येथील कष्टकरी यंत्रमाग कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी पँथर आर्मी नेहमीच कटीबद्ध राहिली आहे. शहराच्या वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी देणे आणि प्रदूषणासारख्या गंभीर समस्यांतून शहराला बाहेर काढणे ही काळाची गरज असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. महायुतीने विकासाच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवल्याने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाठिंबा घोषित करण्यात आला.
प्रमुख मागण्या आणि अटी:
पँथर आर्मीने पाठिंबा देताना खालील प्रमुख अपेक्षा व्यक्त केल्या आहेत:
प्रदूषणमुक्त इचलकरंजी: पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी रासायनिक सांडपाण्यावर ठोस कृती आराखडा राबवणे.
कामगारांचे हित: यंत्रमाग कामगारांना किमान वेतन मिळवून देणे आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र व विमा योजना राबवणे.
आरोग्य सुरक्षा: कारखान्यांच्या धुरामुळे होणाऱ्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवून श्वसनाचे आजार रोखण्यासाठी अद्ययावत यंत्रणा बसवणे.
सुरक्षित नागरिकत्व: उच्च दाबाच्या वीजवाहिन्याखालील जीवघेणी बांधकामे रोखणे आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली लागू करणे.
नागरी सुविधा: कामगार वस्त्यांमध्ये शुद्ध पाणी, गटारी आणि अद्ययावत सरकारी दवाखान्यांची निर्मिती करणे.
कार्यकर्ते मैदानात उतरणार
याप्रसंगी पँथर आर्मीचे संस्थापक प्रमुख संतोष एस. आठवले, युवा प्रदेशाध्यक्ष नितिनभाऊ घावट, समीर विजापुरे, अभिषेक कांबळे, शिवसेना शहर प्रमुख भाऊसो आवळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीच्या विजयासाठी पँथर आर्मीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचा निर्धार अक्षय कदम यांनी व्यक्त केला आहे.

