शाहूवाडी राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; बनावट मद्यनिर्मितीचे रॅकेट उद्ध्वस्त सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपींना कोठडी

कोल्हापूर (प्रतिनिधी):
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शाहूवाडी पथकाने बनावट विदेशी मद्यनिर्मिती आणि वाहतूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पथकाने २ लाख २८ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अशी झाली कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर-आंबा मार्गावर बोरपाडळे (ता. पन्हाळा) हद्दीत नाकाबंदी दरम्यान संशयित दशरथ जालिंदर कुंभार (वय २९) हा आपल्या ॲक्टिव्हा (MH-09-DW-49) वरून जात असताना त्याला थांबवण्यात आले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ‘रॉयल स्टॅग’ आणि ‘मॅकडॉल नंबर वन’ या ब्रँडचे बनावट मद्याचे तीन बॉक्स आढळले.
तपासात मोठे रॅकेट उघड
अटक करण्यात आलेल्या दशरथ कुंभार याची सखोल चौकशी केली असता, त्याने हे मद्य जयदीप रघुनाथ कांबळे (वय ३६, रा. तासगाव, ता. हातकणंगले) याच्याकडून आणल्याचे कबूल केले. या माहितीच्या आधारे पथकाने निळे (ता. शाहूवाडी) येथे छापा टाकला. या छाप्यात बनावट दारूचे आणखी तीन बॉक्स, एक स्प्लेंडर मोटारसायकल (MH-09-DB-7496), मद्य भेसळीसाठी वापरला जाणारा काळा रंग आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले.
अधिकारी आणि पथक
ही कारवाई कोल्हापूर विभागीय उप-आयुक्त विजय चिंचाळकर, जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे, आणि उप-अधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूवाडी निरीक्षक किरण बिरादार व त्यांच्या पथकाने केली. या पथकात दुय्यम निरीक्षक व्ही. आर. शिताळे, आर. डी. गोसावी, एस. आर. गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सदानंद ठोंबरे, के. एम. पाटील, कॉन्स्टेबल ए. ए. कारंडे, जय शिनगारे, वाहन चालक एम. डी. पाटील व एम. बी. पोवार यांचा समावेश होता.
न्यायालयीन कोठडी
दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना पन्हाळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास निरीक्षक किरण बिरादार करत आहेत.
