१० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पन्हाळ्यातील तलाठी एसीबीच्या जाळ्यात
कोल्हापूर: (विशेष प्रतिनिधी)
पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) हणमंत शंकर बदडे (वय ५५) यांना १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील ४ हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरो (ACB), कोल्हापूर यांनी कारवाई केली आहे. उर्वरित ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नेमकी घटना काय?
यातील तक्रारदार यांनी सातवे (ता. पन्हाळा) येथे विक्री केलेल्या एका प्लॉटच्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र खरेदी दस्तावर नोंदवण्यात आले होते. ही चुकीची फेरफार नोंद दुरुस्त करण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. ही दुरुस्ती करण्यासाठी तलाठी हणमंत बदडे यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारीपूर्वीच त्यांनी ४ हजार रुपये स्वीकारले होते. उर्वरित ६ हजार रुपयांसाठी त्यांनी तगादा लावल्याने तक्रारदाराने कोल्हापूर एसीबीकडे धाव घेतली.
एसीबीची कारवाई
तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपी बदडे यांनी लाचेची मागणी केल्याचे आणि यापूर्वी ४ हजार रुपये घेतल्याचे मान्य केले. सध्या आरोपी हा कसबा बावडा (ता. करवीर) येथे वास्तव्यास आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ माजली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई एसीबी पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उप अधीक्षक वैष्णवी पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, संदिप काशीद, सचिन पाटील, कृष्णा पाटील आणि प्रशांत दावणे यांचा समावेश होता.
नागरिकांना आवाहन:
लाचखोरी किंवा अपसंपदेबाबत काही तक्रारी असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ९४०४३२१०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
