ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ फ्रेनी झाल तारापोर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’
‘युनिव्हर्सिटी विमेन्स असोसिएशन’तर्फे सन्मान; संस्थेच्या सभागृहाचे ‘डॉ. प्रभा देवधर स्मृती सभागृह’ असे नामकरण
पुणे :
युनिव्हर्सिटी विमेन्स असोसिएशन (यूडब्ल्यूए), पुणे यांच्या वतीने ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि ‘एसएनडीटी होम सायन्स महाविद्यालय, पुणे’च्या संस्थापक प्राचार्या फ्रेनी झाल तारापोर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. तारापोर यांनी शिक्षण क्षेत्रातील दिलेले उल्लेखनीय योगदान आणि सामाजिक विकासासाठी केलेल्या प्रभावी कार्याचा गौरव करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
फ्रेनी झाल तारापोर या ‘यूडब्ल्यूए’च्या माजी विश्वस्तही आहेत. या दिमाखदार सोहळ्याला प्रेमचंद बाफना, डॉ. सुचित्रा रॉय, मालती कलमाडी आणि स्वतः पुरस्कारार्थी फ्रेनी झाल तारापोर उपस्थित होत्या.
डॉ. प्रभा देवधर यांच्या स्मृती जतन
याच कार्यक्रमात संस्थेच्या वतीने एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. ‘यूडब्ल्यूए’च्या माजी अध्यक्षा डॉ. प्रभा देवधर यांच्या स्मरणार्थ संस्थेच्या सभागृहाचे नामकरण आता ‘डॉ. प्रभा देवधर स्मृती सभागृह’ असे करण्यात आले आहे. डॉ. देवधर यांनी संस्थेचा पाया भक्कम करण्यासाठी आणि विशेषतः ‘वर्किंग वूमेन्स हॉस्टेल’च्या उभारणीत बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेऊन, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रातील या दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी या सोहळ्याला ‘बायफ’चे (BAIF) माजी अध्यक्ष डॉ. नारायण हेगडे, एसएनडीटी महाविद्यालयाचे प्राध्यापक, माजी विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच फ्रेनी झाल तारापोर व डॉ. प्रभा देवधर यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन रवीबाला काकतकर यांनी केले.
