ओबीसींना स्वतःचे हक्क गमवायचे नसतील तर ऍड बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे! ; वंचित प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचे प्रतिपादन

रत्नागिरी/ जिल्हा प्रतिनिधी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने वंचित बहुजन संघटन संवाद,समीक्षा मेळावा चिपळूणातील विवेकानंद सभागृह येथे संपन्न झाला. युवकांच्या प्रचंड उत्साहात भर पावसामध्ये बाईक रैलीने दमदार सुरुवात झाली. यावेळी प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मेळावा संपन्न झाला.

प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर म्हणाल्या , संविधानाच्या माध्यमातून ओबीसींना जे दिलेय ते हिसकावून घेण्याचा घेण्याचा प्रयत्न इथले प्रस्थापित करत आहे. विशेषतः ओबीसींच्या जनगणनेच्या ज्वलंत प्रश्न देशाच्या पातळीवर उभा आहे. सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी किंवा भाजपाने असे सांगितले की, आम्हाला राज्यावर निवडून द्या.. आम्ही ओबीसींची जनगणना करू! परंतु ज्या विश्वासाने आश्वासन देऊन मते मागितली तेच नरेंद्र मोदी आता निर्लज्जपणे कोर्टात शपठेवर सांगतात की, आम्ही ओबीसींची जनगणना करणार नाही. यासोबतच 1911 साली झालेल्या जनगणनेची आकडेवारी सुद्धा जाहीर करत नाही. हीच ओबीसी समाजाला मोठी चपराक आहे. महाविकास आघाडीच्या नावे ओरड करून जनगणना होत नाही असे सांगितले जाते. जय पद्धतीने मराठा आरक्षणाची यांनी वाट लावली अगदी त्याच पद्धतीने केंद्र सरकार ओबीसींच्या आरक्षणाची वाट लावण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे. आता ओबीसींचे शैक्षणिक व इतर आरक्षण हि धोक्यात आहे. त्यामुळे ओबीसींनां स्वतःचे हक्क, अधिकार गमवायचे नसतील तर ऍड बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून वंचित बहुजन आघाडी या एकमेव पक्षाला प्रत्येक ओबीसींने आपलेसे म्हणून धाडसाने काम केलं पाहिजे. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी चिपळूण येथील मेळाव्यात केले.

त्या पुढे म्हणाल्या, कोकणची भूमी सुपीक आहे. त्याच कोकणात आपल्या कामाला प्रचंड वेग आणण्यास वाव आहे. या भागात प्रचंड लोकसंख्या असलेला कुणबी समूह असून त्यामधून एक तरी आमदार किंवा खासदार निवडून येत होते. परंतु आजच्या घडीला एकही खासदार अथवा आमदार या भागातून निवडून आलेला नाही. इतर समुहांचे देखील प्रतिनिधित्व दिसून येत नाही. ज्या घराणेशाहीच्या विरोधात दंड थोपडले आहेत त्या घराणेशाहीची मजबुती दिसून येते. गेल्या लोकसभा निवडणुकीत ऍड बाळासाहेब आंबेडकरांची प्रचंड मोठी सभा या रत्नागिरी झाली होती. त्या सभेला एक लाखाहुन अधिक लोक उपस्थित होते. मात्र लोकसभेचे उमेदवार काका जोशींना 32 हजार मतदान झाले. या भागात प्रचंड मोठा जनसमुदाय असा आहे की, ऍड बाळासाहेब आंबेडकर जे व्हिजन घेऊन जात आहेत त्यावर ते आकर्षित होऊन विश्वास ठेवत आहे. परिवर्तनशील क्षमता असलेल्या वंचित बहुजन आघाडी पक्षांबद्दल जो समुदाय पाहत आहे त्या समुदायाला मतपेटीत आणण्याचा महत्त्वाचा विषय आहे. गेल्या लोकसभेत मोठा राजकीयदृष्टया कमजोर असलेला भाग कोकण पट्टा आहे. या भागात अनेक समूहाच्या लोकांना बाळासाहेबांवर विश्वास आहे. त्यांना मतपेटीत आणायला हवे. तसेच इतर समुदाय आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीची भूमिका पटवून सांगितली पाहिजे. ज्यामध्ये आपण कमी पडत आहोत ती यंत्रणा कशी उभी करता येईल याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. महाराष्ट्रात प्रस्थापित राज्यकर्त्यांना निरुत्तर करताना ऍड बाळासाहेब आंबेडकर कमी पडत नाही. त्यांनीच आपल्याला ओबीसीमध्ये संवाद साधण्यासाठी सभा घेण्याचे मोठे आवाहन केले आहे. अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी सभागृहामध्ये दिली.

मेळाव्यातील उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी यांनी संघटनात्मक बांधणीची व्याख्या सांगून कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. त्याचबरोबर संघटन कौशल्य कसे असावे याबाबत आढावा घेतला व शिस्त आणि शिष्ठाचार याचे दाखले दिले. पदापेक्षा कामाला महत्व द्या हे पद आज आहे उद्या नाही परंतु पक्षाचा अजेंडा महत्वाचा आहे. वंचित बहुजन आघाडीची ताकद फार मोठी असून ती प्रत्यक्षात दाखवून देण्याची सर्व बहुजनांची जबादारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या संघटन समीक्षा संवाद मेळावा कार्यक्रमाला मंचावर वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी लोकसभेचे उमेदवार काका जोशी, भारतीय बौद्ध महासभेचे ज बा. कदम, (उत्तर ) महासचिव सुदर्शन सकपाळ, रत्नागिरी ( दक्षिण ) जिल्हाध्यक्ष रुपेंद्र जाधव ,रत्नागिरी (उत्तर) जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव, सुभाष जाधव , डॉ. चंदनशिवे, संदीप जाधव, अनंत सावंत , महेंद्र पवार उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (दक्षिण) जिल्हा महासचिव प्रशांत कदम यांनी केले.