आरक्षणाने देश आणि समाजाची प्रगती होते.

तीन लिटर दूध तापविल्यावर किती साय जमा होईल ….आणि शंभर लिटर दूध तापवले तर किती साय येईल … ह्याचा विचार करणे म्हणजे आरक्षण होय.

शिक्षण हक्क कायदा २००९ साली आला नी तो येण्यासाठी आम्ही शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते भाई एन. डि.पाटील ह्यांच्या सोबत काम करत होतो. त्यावेळी भाई एन. डी. यांनी एकदा सांगितलं की, स्री-दास्य-वर्ण-जाती ग्रस्त भारतीय समाज व्यवस्थेने देशाचं फार मोठं नुकसान केलं आहे.

इथ फक्त तीन लिटर दूध तापवले गेले व त्यामुळे तेवढीच साय इथ तयार झाली.
इथल्या समाज व्यवस्थेने सत्यानव ( ९७) लिटर दूध लक्षातच घेतले नाही….त्याची घनघोर उपेक्षा केली.

इथे जर १०० लिटर दूध तापवले गेले असते तर भारत कुठं च्या कुठं राहिला असता.

भाई एन. डी.ह्यांचं हे म्हणणं मी तामिळनाडू मधील ६९टक्के आरक्षणा च्या संदर्भात घेतो. तामिळनाडूत बऱ्याच काळापासून ६९ टक्के आरक्षण आहे….तमिळनाडू (आधीचा मद्रास प्रांत ) जातीय आरक्षण देण्यात पुढं होतं. तेथील पेरियार ह्यांच्या नेतृत्वाखालील ब्राम्हणेतर चळवळीचे योगदान फार मोठे आहे हे लक्षात घ्यावं लागेल. १९५० साली तत्कालीन मद्रास प्रांताने वैद्यकीय शिक्षणात जातीनिहाय आरक्षणाची ऑर्डर काढली. गंमत म्हणजे त्याला कम्यूनल ऑर्डर असंही म्हटलं जातं. त्या ऑर्डरला सवर्ण विद्यार्थी चंपकम दोराईराजन यांनी न्यायालयात आव्हान दिलं व न्यायालयाने ती ऑर्डर रद्द केली. आरक्षणाच्या संदर्भात ‘ चंपकम दोराईराजन विरुद्ध मद्रास प्रांत ‘ ही एक प्रसिद्ध केस समजली जाते.
त्यावेळी भारताचे कायदा मंत्री डॉ. आंबेडकर होते नी ताबडतोब म्हणजे १९५१ साली संविधानातील पहिली दुरुस्ती करण्यात आली व त्याद्वारे संविधानात कलम
15 ( 4 ) चा समावेश करण्यात आला. त्यानुसार शिक्षणात आरक्षण देण्याच्या अधिकारावर शिक्कामोर्तब झाले.

मुद्दा असा की आरक्षणाच्या संदर्भातील पहिली संविधान दुरुस्ती मद्रास प्रांताच्या उच्च शिक्षणात जातीय आरक्षण देण्याच्या निमित्ताने झाली….!

आज तमिळनाडू अनेक क्षेत्रांत पुढं आहे. तामिळनाडूचे मेरीट कमी नाही झाले तर अनेक क्षेत्रांत वाढले….!

अगदी सांस्कृतिक क्षेत्रात जरी बघितलं तरी हे लक्षात येतं.

तमिळ चित्रपट हिंदी नी मराठी चित्रपटापेक्षा कितीतरी दर्जेदार असताहेत.
जय भीम हे त्याचं एक उदाहरण.
दृश्यम सारखे अनेक चित्रपट हिंदीत आणावे लागतात.

तर मुद्दा असा की आरक्षणाने मेरीट कमी होत नाही तर मेरीट अधिक सार्वजनिक होतं…..!

प्रतिनिधीत्व मिळालं तर समाजातील सर्व घटकांना समाज व देश घडविण्यात सहभाग मिळतो.

३ लिटर दुधाची साय नी १०० लिटर दुधाची साय ….आपल्याला काय हवयं…..?

✒️लेखक – डॉ. संजय दाभाडे, पुणे
9823529505
sanjayaadim@gmail.com