बुलढाणा जिल्हापरिषदेचे 68 तर पंचायत समित्यांचे गण 136 होण्याचे संकेत

बुलडाणा : करण झनके :

वाढीव लोकसंख्या लक्षात घेता राज्य शासनाने नगरपालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदांचे मतदारसंघ वाढविण्याचा धोरणात्मक तत्वतः निर्णय घेतल्याने बुलडाणा जिल्हा परिषदेसह 13 पंचायत समित्यांचे मतदारसंघ वाढण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. नजीकच्या काळात यावर राज्य निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले तर जिल्हापरिषदेचे 68 तर पंचायत समित्यांचे गण 136 होण्याचे संकेत आहेत. यामुळे मिनी मंत्रालयाचा रणसंग्राम आणखीनच व्यापक व रंगतदार होणार हे उघड आहे.

कोरोनाच्या प्रदीर्घ मुक्कामामुळे सन 2021 ची राष्ट्रीय जनगणना होऊ शकली नाही. यामुळे सध्याची अचूक वाढीव लोकसंख्या कळू शकत नाही. मात्र भारतीयांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेतले तर यात भरीव वाढ झाली असणार यात शंकाच नाही! यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सदस्यसंख्या वाढविण्याचा धोरणात्मक निर्णय अलीकडेच शासनाने घेतला होता. नगरपरिषदेमधील सदस्यसंख्या वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.