बुलडाणा (करण झनके) : शिवसेनेतून वंचित बहुजन आघाडी आणि काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षात दाखल झालेल्या विजयराज शिंदे यांना आल्या आल्या पक्षानेही योग्य सन्मान देत थेट प्रदेश सरचिटणीसपदी बसवले. पण शिंदेंनी आज या पक्षावर सडकून टीका करणाऱ्या प्रविण तोगडियांची संगत केल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपातील सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नरेंद्र मोदींचे सध्या पक्के शत्रू मानले जाणाऱ्या तोगडियांशी शिंदेंनी केलेली ही दोस्ती भाजपातील अनेकांना रूचलेली नसल्याचे दिसून येत आहे. शिंदेंच्या या भूमिकेवर भाजपातूनच नाराजी वाढली आहे.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राजकीय कारकिर्दीला लागलेले ग्रहण भाजपातील प्रवेशामुळे संपले. पण याच पक्षाच्या विरोधकांशी हातमिळवणी करण्याचा शिंदेचा उद्देश नक्की काय, हा प्रश्न आता भाजपा कार्यकर्ते खासगीत विचारू लागले आहेत. संस्थापक शिवसैनिक, तालुकाप्रमुख, नगरसेवक ते आमदार अशी विजयराज शिंदे यांची राजकीय वाटचाल राहिली आहे. अपयशाला सलग दोनदा ते सामोरे गेलेले आहेत. त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा भाजपात प्रवेशानंतर रूंदावल्या आहेत.