१६ वर्षीय अल्पवयीन युवतीचे अपहरण ; मेहकर तालुक्यातील घटना

मेहकर (बुलढाणा) : गावातीलच तरुणाने १६ वर्षीय मुलीला पळवून नेल्याची घटना बेलगाव (ता. मेहकर) येथे समोर आली आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दीपक परशराम ठाकरे असे संशयित तरुणाचे नाव आहे. त्याने मुलीला मोटारसायकलवर बसवून कुठेतरी पळवून नेल्याची माहिती गावातीलच दोघांनी मुलीच्या ४२ वर्षीय वडिलांना दिली. २५ डिसेंबरच्या रात्री १० ते २६ डिसेंबरच्या पहाटे एकदरम्यान (मध्यरात्री) ही घटना घडली. पती-पत्नी कुटुंबासह जेवण करून झोपले होते. मध्यरात्री पत्नीला जाग आल्याने त्यांनी पाहिले असता त्यांची १६ वर्षे ११ महिन्यांची मुलगी अंथरूणावर दिसून आली नाही. त्यांनी पतीला सांगितल्यानंतर गावात रात्रभर शोध घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी नातेवाइक, मैत्रिणींकडे चौकशी करण्यात आली. त्यानंतर गावातीलच दोघांनी तिला दीपकने पळवून नेल्याचे सांगितले. त्यावरून मुलीच्या वडिलांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपास पोहेकाँ दिलीप राठोड करत आहेत.