पत्रकार सन्मान पुरस्काराने नरेश पांचाळ सन्मानित ,पोंभुर्लेत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मारकात रंगला पुरस्कार सोहळा

द पॉवर ऑफ मिडिया फ़ाउंडेशन दक्षिण रत्नागिरीच्या वतीने आज पत्रकार दिनी दैनिक सकाळचे पत्रकार नरेश पांचाळ यांना दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पणतू सुधाकर जांभेकर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ पत्रकार,जि.प.रत्नागिरीचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांच्या उपस्थितीत पत्रकार सन्मान पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.हा पुरस्कार सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले येथे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारकात संपन्न झाला.

द पॉवर ऑफ मिडिया फ़ाउंडेशन दक्षिण रत्नागिरीच्या वतीने आज पत्रकार दिनी पोंभुर्ले येथील दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या निवासस्थानी कार्यकारिणीने भेट दिली.यावेळी संघटनेचे अध्यक्ष दुर्गेश आखाडे,जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार सुर्वे,रत्नागिरी तालुकाध्यक्ष सिध्देश मराठे,राजापूर तालुकाध्यक्ष गोकुळ कांबळे,रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष सचिन सावंत आणि पुरस्कार विजेते पत्रकार नरेश पांचाळ उपस्थित होते.संघटनेच्या कार्यकारिणीने सर्वप्रथम दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज पणतू सुधाकर जांभेकर यांची भेट घेतली.यावेळी सुधाकर जांभेकर यांनी स्मारक आणि स्मारकातील उपक्रमविषयी माहिती दिली.दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मूळ छायाचित्र मिळत नव्हते.ते छायाचित्र मिळविण्यासाठी मुंबईत जाऊन केलेली खटपट सांगताना आचार्य बाळशास्त्री जांभेकरांवर आपला मुलगा पीएचडी करत असल्याचे अभिमानाने सांगितले.तसेच द पॉवर ऑफ मिडिया फ़ाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले.
पुरस्कार वितरण सोहळा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारकात संपन्न झाला.यावेळी जिल्हाध्यक्ष दुर्गेश आखाडे यांनी प्रास्ताविकात द पॉवर ऑफ मिडिया फ़ाउंडेशनच्या उपक्रमाची माहिती दिली तसेच पत्रकार सन्मान पुरस्कारप्राप्त नरेश पांचाळ यांचा परिचय करून दिला.गेली २० वर्ष दैनिक सकाळ वृत्तपत्रात कार्यरत असलेले नरेश पांचाळ यांचे सांस्कृतिक चळवळीतील योगदान सांगताना ते रंगभूषाकार आणि मूर्तीकार असल्याची ओळख करून दिली.पुरस्कारानंतर आपल्या मनोगतात नरेश पांचाळ म्हणाले की,गेली २० वर्ष प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पोचपावती मला आज पत्रकार सन्मान पुरस्कारातून प्राप्त झाली.मी माझे कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी मला मिळालेली हि प्रेरणा आहे.माझ्या यशात माझे सहकारी पत्रकार,मित्र,कुटूंबियाचे योगदान आहे.