रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सकारात्मक पत्रकारिता पाहायला मिळते. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या शासनाच्या योजना खेडोपाडी पोहोचण्यासाठी लेखणी हातात घेऊन पायाभूत विकासासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे आयोजित पत्रकार दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी वाहतूक माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, पोलिस निरीक्षक शिरीष सासणे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सचिव राजेश कळंबटे उपस्थित होते.
ते म्हणाले आजच्या वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर चोरी, अपघातांच्या बातम्या असतात. परंतु आजच्या विद्यार्थ्यांसमोर आपण विकासात्मक बातम्या दिल्या पाहिजेत. नवीन पत्रकारांनाही योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. समाजाची जडणघडण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. जिल्ह्यात सकारात्मक पत्रकारिता आहे. नवीन पत्रकारांनाही आदर्शवत वाटावे असे काम उभे केले पाहिजे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. समाजाची जडणघडण होण्याच्या दृष्टीने पत्रकारांनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रेय महाडिक यांना पत्रकार पै. रशिदभाई साखरकर स्मृती पुरस्कार, टीव्ही ९ चे पत्रकार मनोज लेले यांना पत्रकार गौरव पुरस्कार आणि टीव्ही ९ चे कॅमेरामन अनिकेत होलम यांना व्हिडिओ जर्नालिस्ट गौरव पुरस्कार देण्यात आला. महिला पत्रकार सौ. कोमल कुलकर्णी- कळंबटे यांना पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोविड रुग्णालयाचे प्रमुख डॉ. विकास कुमरे यांना पत्रकारमित्र सन्मान पुरस्कार यांना जाहीर झाला.