साडेपाच लाखाची लाच घेताना राधानगरी प्रांताधिकारी प्रसेनजित प्रधान यांच्यासह एकाला अटक
अँटी करप्शन पथकाची प्रांत कार्यालयात कारवाई

कोल्हापूर,दि.९ (प्रतिनिधी)
स्टोन क्रेशर उद्योजका वरील कारवाई टाळण्यासाठी साडेपाच लाखाची लाच स्वीकारणाऱ्या राधानगरीचे प्रांताधिकारी प्रसेनजित बबनराव प्रधान व.व. ४० (मूळ गाव घ.न.४५०, मित्र नगर, नवघन कॉलेज रोड, बीड शहर, बीड ) आणि फराळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच संदीप जयवंत डवर व.व.४२ या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मध्यवर्ती शासकीय इमारत मधील कार्यालयात पकडले.पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि त्यांच्या पथकाने कारवाई केल्याने महसूल खात्यासह कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान आणि सरपंच संदीप डवर यांच्यावर शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून,
पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की तक्रारदार फराळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्टोन क्रेशरचा व्यवसाय आहे. स्टोन क्रेशरवरील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे परिसरातील सर्व रस्ते खराब झाले आहेत. व धुळीमुळे प्रदूषण तसेच काही घरांच्या भिंतीना भेगा पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरपंच संदीप डवर यांनी ग्रामपंचायती तर्फे तक्रारदार व्यावसायिकास क्रेशर बंद का करू नये याची कारण दाखवा नोटीस दिली होती. सरपंच डवर यांच्या नोटिशीच्या आधारे प्रांताधिकारी प्रसन्नजीत प्रधान यांनी ही स्टोन क्रेशर व्यावसायिकाला नोटीस दिली होती. ही कारवाई टाळण्यासाठी व्यावसायिकाने सरपंच आणि प्रांताधिकारी यांची त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन भेट घेऊन विनंती केली होती मात्र सरपंच यांनी ही कारवाई न करण्यासाठी प्रांताधिकारी प्रधान यांना १० लाख आणि स्वतः साठी प्रत्येक महिन्याला एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती.व्यावसायिकाने प्रांताधिकारी यांच्या निवासस्थानी जाऊन सरपंच यांनी आपल्यासाठी दहा लाखाची मागणी केली असल्याचे सांगितले त्यावर प्रांताधिकार्यांनी संमती दर्शवून सरपंच यांच्याकडे पूर्तता करण्यास सांगितले सरपंच डवर प्रांताधिकारी कार्यालया जवळ आले होते,
व्यावसायिकाकडून प्रांताधिकारी च्यासाठी पाच लाख आणि स्वतःसाठी ५० हजार स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध पथकाचे पोलिस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि त्यांच्या पथकाने सरपंचांना रंगेहात पकडले त्यानंतर तातडीने प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन प्रांताधिकारी प्रसेनजित प्रधान यांनाही ताब्यात घेतले.
आज रविवार सुट्टीचा दिवस असतानाही प्रांताधिकारी कार्यालयात आले होते. महसूल खात्यातील अधिकाऱ्याला लाच प्रकरणी अटक झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव,सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत,पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, अजय चव्हाण शरद पोरे, मयुर देसाई, रुपेश माने, अमर भोसले, विकास माने, नवनाथ कदम यांच्या पथकाने केली.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की लाचेची अथवा अपसंपदे बाबत तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधावा.