लता मंगेशकर ऑक्सिजन सपोर्टवर; डॉक्टरांसह कुटुंबियांनी दिली प्रकृतीविषयी महत्वाची माहिती

लता मंगेशकर ऑक्सिजन सपोर्टवर; डॉक्टरांसह कुटुंबियांनी दिली प्रकृतीविषयी महत्वाची माहिती

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना नुकतीच करोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. लता मंगेशकरांना करोनाची लागण झाल्यानंतर अनेकजण त्या लवकर बरे व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत आहेत. सध्या त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत त्यांची भाची रचना शहा यांनी माहिती दिली.

रचना शाह यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीनुसार, लतादीदी यांना कोविड-19 ची सौम्य लक्षणे आहेत. पण त्यांची प्रकृती आणि वय लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यावर डॉक्टरांची सर्वोत्कृष्ट टीम उपचार करत आहे. लतादीदी या सध्या ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.

लता मंगेशकर या ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील डी वॉर्डमध्ये दाखल आहेत. त्या वॉर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लता मंगेशकर या काही इतर काही वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आल्या होत्या. मात्र उपचारादरम्यान त्यांना करोनाची लागण झाली.

ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील डॉ. प्रतित समधानी हे लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत आहेत. लता मंगेशकर यांना गेल्या शनिवारी रात्री दाखल करण्यात आले होते. त्या कोरोनासह न्यूमोनियाशीही झुंज देत आहेत.