आमदार भास्कर जाधवांनी हाती घेतले बसचे स्टेअरिंग

आमदार भास्कर जाधवांनी हाती घेतले बसचे स्टेअरिंग

रत्नागिरी : कधी शेतात नांगरणी करताना तर कधी शिमगोत्सवात पालखी नाचविताना दिसणारे आमदार भास्कर जाधव चक्क बस चालवितानाच चिपळूणकरांना दिसले.

भास्कर जाधव यांना बस चालविताना पाहून सारेच अवाक् झाले. चिपळूण महामार्गावरील एका कार्यालयातून एक नवी कोरी बस बाहेर पडली. रस्त्यावरुन चालणारी ही बस पाहून साऱ्यांनाच कुतूहल वाटले . अनेकजण नव्या कोऱ्या बसकडे पाहत असतानाच या बसच्या चालकाच्या जागी बसलेल्या व्यक्तीला पाहून अनेकांना धक्काच बसला .

या चालकाच्या जागेवर चक्क चिपळूणचे आमदार भास्कर जाधव बसले होते आणि ते स्वत : ही बसच चालवत होते . हे सारे पाहिल्यानंतर सारेच अवाक् झाले . भास्कररावांनी अचानक बस का चालवली, असा प्रश्न अनेकांना पडला.

त्यानंतर या बस चालवण्यामागील किस्सा सर्वांसमोर आला . भास्कर जाधव यांच्या लोटेतील एका कार्यकर्त्याने व्यवसायासाठी ही बस आणली होती . बस घेऊन तो मित्र थेट भास्कर जाधव यांच्या कार्यालयाजवळ आला . भास्कर जाधव यांनी श्रीफळ वाढविले आणि गाडीला हार घातला. परंतु ते एवढ्यावरच न थांबता गाडीत चढले , त्यांनी गाडीचे स्टेअरिंग हाती धरले आणि गिअर टाकून गाडी रस्त्यावर आणली . चिपळुणातून फेरफटका मारुन ते पुन्हा कार्यालयाजवळ आले . अत्यंत सफाईदारपणे गाडी चालविताना पाहून अनेकांनी तर ‘ शेठ , तुमचे ड्रायव्हिंगही आहे ग्रेट ‘ , अशी दाद देऊन टाकली .