…म्हणून VIVO ऐवजी TATA झाले IPL चे मुख्य प्रायोजक

इंडियन प्रिमियर लीगच्या प्रशासकीय समितीने मंगळवारी टाटा कंपनीचं नाव आयपीएलचे अधिकृत प्रायोजक म्हणजेच मेन स्पॉन्सर म्हणून निश्चित केलं. त्यामुळेच चिनी स्मार्ट फोन निर्माती कंपनी असणाऱ्या विवो ऐवजी या वर्षीपासून टाटा हे आयपीएलचे प्रायोजक असतील. मात्र विवोचा दोन वर्षांचा करार शिल्लक असताना अचानक टाटा कंपनीला टायटल स्पॉन्सर का बनवण्यात आलं यासंदर्भातील पडद्यामागील घडामोडी समोर आल्या आहेत.

एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या समितीने टाटांना मुख्य प्रायोजक म्हणून निवडण्यामागे विवोने घेतलेला एक निर्णय कारणीभूत ठरला. विवोने २०१८ मध्ये वर्षाला ४४० कोटी रुपये खर्च करुन टायटल स्पॉनर्सचे हक्क २०२४ पर्यंत विकत घेतले होते. मात्र कंपनीने अचानक माघार घेतली आहे. “आम्ही टाटांकडे मुख्य प्रायोजक म्हणून पाहत आहोत. विवोला त्यांचा करार रद्द करायचा आहे. या कराराचे दोन वर्ष अद्यापही बाकी आहेत. त्यामुळेच या दोन वर्षांच्या कालावधीसाठी टाटा हेच मुख्य प्रायोजक असतील,” अशी माहिती या घडामोडींशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.