नवी दिल्ली: देशातील सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींची या वर्षातील मुख्यमंत्र्यांसोबतची ही पहिलीच बैठक आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला बळकटी देण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी, ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा, असे म्हटले आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना परिस्थितीवर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत भाष्य केले. “ओमाक्रॉनचा प्रसार पूर्वीच्या प्रकारांपेक्षा वेगाने होत आहे, तो अधिक प्रसारीत होत आहे. आपले आरोग्यतज्ञ परिस्थितीचे मूल्यांकन करत आहेत. स्पष्टपणे आम्ही सतर्क आहोत. राहावे लागेल. शंभर वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीविरुद्धचा भारताचा लढा आता तिसर्या वर्षात दाखल झाला आहे. कठोर परिश्रम हाच आमचा एकमेव मार्ग आहे आणि विजय हाच एकमेव पर्याय आहे. आम्ही १३० कोटी भारतीय आमच्या प्रयत्नांनी नक्कीच करोनावर विजय मिळवू,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.