महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्यंत जिगाव प्रकल्पाला “भीमसागर प्रकल्प” असे नाव देण्यात यावे अन्यथा रस्त्यावरची लढाई करू-भाई प्रदीप अंभोरे यांचा इशारा

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्यंत जिगाव प्रकल्पाला “भीमसागर प्रकल्प” असे नाव देण्यात यावे अन्यथा रस्त्यावरची लढाई करू-भाई प्रदीप अंभोरे यांचा इशारा

नांदुरा :- 14 एप्रिल 2022 येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्यंत जिगाव प्रकल्पाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमसागर प्रकल्प असे नाव देण्यात यावे यासाठी आज दिनांक 14 जानेवारी रोजी मा. मुख्यमंत्री यांना नांदुरा तहसीलदार मार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे भाई प्रदीप अंभोरे संस्थापक अध्यक्ष भूमी मुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या नामविस्तार दिनाच्या शुभ पर्वावर इशारा दिला आहे.

  सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की सन 1978 साली महाराष्ट्र राज्याच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद असे करण्यासाठी बहुमताने ठराव पारित करण्यात आला परंतु त्याच रात्री येथील जातीयवादी मनुवादी प्रवृत्तीने वळवळ केली व संपूर्ण महाराष्ट्रभर विशेषत्वाने मराठवाड्यात जातीय दंगली भडकल्या कित्येक घराची राखरांगोळी करण्यात आली. प्रत्येकाचे खून पाडले गेले हा जो आगडोंब उसळला त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्रशासन हादरले व दोन्ही सभागृहात मंजूर झालेला शासन ठराव बासनात गुंडाळून ठेवला यामुळे फुले,शाहू, आंबेडकरी समाजातील विचारवंत तरुणांनी या विरुद्ध यल्गार पुकारला तरीही हा प्रश्न सतत 16 वर्षे रेंगाळत ठेवला कित्येकांना यामध्ये आपले बलिदान द्यावे लागले. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्र राज्याला ही घटना शोभणारी नव्हती म्हणून आंबेडकरी जनतेच्या नेटाने तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी सुवर्णमध्य काढून मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार 14 जानेवारी 1994 रोजी तब्बल सोळा वर्षांनी मकर संक्रांतीच्या पर्वावर केला हा इतिहास सर्वश्रुत आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने आमचा अंत पाहू नये मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीवर पूर्णत्वास येत असलेल्या जिगाव सिंचन प्रकल्पाला येत्या 14 एप्रिलपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर "भीम सागर प्रकल्प" असे नामकरण करावे अन्यथा आम्हाला रस्त्यावरची लढाई करावी लागेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी.

दिलेल्या निवेदनावर भाई प्रदीप अंभोरे, दिनेश ब्राह्मणे,अजय भिडे,शैलेश वाकोडे, ज्ञानेश्वर कांडेलकर,संतोष तायडे,धर्मेश तायडे,अर्जुन वाकोडे, किशोर इंगळे, भीमराव तायडे, प्रमोद तायडे, दिनेश तायडे, भगवान तायडे, दिलीप इंगळे, अभीराजे हिवराळे, सदानंद तायडे, अरुण सुरवाडे, समाधान तायडे, दिलीप तायडे, राहुल तायडे, माणीकराव तायडे यासह शेकडो आंबेडकरी जनतेच्या सह्या आहेत.