कोकणातील आगामी तीन दिवस थंडीचे

कोकणातील सर्वच जिल्ह्यात पुढील तीन दिवस कडाक्याची थंडी पडणार आहे. विशेषत: रायगड, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा कमालीचा घसरणार आहे. उत्तर-पश्चिम भागावर पश्चिमी चक्रावात आणि चक्रीय स्थिती सक्रिय झाल्याने धुक्यासह कडाक्याची थंडी पडणार आहे. निर्माण झालेल्या उत्तरी राज्यातील वातावरणाचा परिणाम कोकणासह किनारी भागातही होणार आहे. या अतितीव्र थंडीच्या लाटेमुळे किनारी जिल्ह्यातील गारठा वाढणार आहे. मंगळवारपासून किमान तापमानाची सुरू झालेली घट गुरूवारी देखील कायम होती. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात गारठ्यात वाढ होऊ लागली आहे. यामध्ये आगामी तीन दिवस सातत्य राहण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) कुलाबा वेधशाळेने दिले आहेत. गुरूवारी रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी कमाल 23 तर किमान 17 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.