महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडाळाच्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण
इचलकरंजी/प्रतिनिधी –
महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ यांच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त भेटकार्ड बनवण्याचा उपक्रम हाती घेतला होता. लहान व मोठ्या अशा दोन गटात 95 विद्यार्थ्यांनी 150 भेटकार्ड पाठवून उत्तम प्रतिसाद दिला. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ येथीली देवांग मंदिर येथे प्रमुख अतिथी वडगाव देवांग समाजाचे अध्यक्ष सचिन लोले, इचलकरंजी देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे, मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
स्वागत स्पर्धा समिती सदस्य सौ. रुपाली बुगड यांनी केले. महासचिव रामचंद्र निर्माणकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविकात अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी, आजपर्यंत मंडळाच्या माध्यमातून घेतलेल्या पूरग्रस्तांना मदत, वस्त्रोद्योग परिषद, शैक्षणिक व नोकरीतील विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षणाबाबत चर्चासत्र, वस्त्रोद्योग भूषण पुरस्कार, चौंडेश्वरी मंदिर सजावट स्पर्धा आदी विविध उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच लवकरच समाज संघटना बांधणीसाठी मंडळाचे महाअधिवेशन इचलकरंजी येथे होत असल्याचे जाहीर केले. याप्रसंगी लहान गट व मोठा गट या दोन गटात मिळून जवळपास 26 विजेत्यांचा सत्कार बक्षिसे व प्रशस्तीपत्र देऊन पाहुण्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आकांक्षा रेडेकर या विद्यार्थिनीने कोरोनाच्या काळात मंडळाने चांगला उपक्रम आयोजित करून आमच्या कृतिशीलतेला वाव दिला असे सांगितले. यानिमित्ताने चौंडेश्वरी युवती मंच या संघटनेत नेमणूक झालेल्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षा सौ. प्रिया हावळ, खजिनदार सौ. माया सातपुते, सेक्रेटरी सौ. गीता भागवत यांनी मनोगतात समाज संघटना बांधणीसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे सचिन लोले यांनी महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली चाललेले काम हे समाजाभिमुख व कौतुकास्पद आहे, असे सांगून मंडळाच्या सर्व कामात सहकार्य करू अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे यानी आजपर्यंत मंडळाने केलेल्या कामाचे कौतुक करून भविष्यात हाती घेणार्या सर्व उपक्रमांना देवांग समाज व त्याच्या सर्व संस्था सर्वतोपरी सहकार्य करतील, असे आश्वासन दिले. मंडळाचे सदस्य मनोज खेतमर यांनी आभार मानले. कार्यक्रमास मंडळ सदस्य शितल सातपुते, अमोल सातपुते, सौ. प्राजक्ता होगाडे, सौ. सुधा ढवळे, सौ. प्रिया लोले यांच्यासह स्पर्धेतील विजेते व पालक हजर होते. सदर कार्यक्रमाचे झूम च्या माध्यमातून ऑनलाइन प्रक्षेपण केले असलेने स्पर्धेत भाग घेतलेले असंख्य विद्यार्थी, त्यांचे पालक व इतर समाज बांधव सहभागी झाले होते.
Posted inकोल्हापूर
महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडाळाच्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण
