एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या याचिकेवर सुनावणीला कोर्टाने पुढची तारीख दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अहवालावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा तापला होता. विलीनीकरण या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून संपावर आहेत.
दरम्यान, या संपावर तोडगा निघत नाही असे दिसल्यानंतर राज्य सरकारकडून ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आली होती. मात्र, तरीही काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिल्याने हे आंदोलन चिघळले होते. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले. एसटी संपाची झळ अनेक एसटी कर्मचाऱ्यांना बसली आहे. या संपामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फी, सेवासमाप्ती, निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सेवाजेष्ठतेनुसार एसटी कामगारांना पगारवाढ दिली आहे, अशी माहिती राज्य सरकारने कोर्टात दिली आहे. हायकोर्टाने नेमलेल्या उच्च स्तरीय समितीचा सीलबंद अहवाल हा कोर्टापुढे सादर केला आहे. केवळ एक मुद्दा सोडला तर सर्व मागण्या पूर्ण करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांची हायकोर्टात दिली आहे. आता एसटी विलिनीकरणाच्या याचिकेवर पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.