राज्यातील सरकारी कर्मचार्यांनी आज आणि उद्या अशा दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली होती. विविध मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले होते. यानंतर प्रशासकीय कामे संथ गतीने सुरू होती. काल सायंकाळी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत संघटनांची बैठक पार पडली होती. या बैठकीत प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यात आला होता. त्यानंतर आज सकाळी 11 वाजता संपकरी सर्व संघटनांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत संप मागे घेत असल्याची घोषणा संघटनांनी केली.
केंद्राने जुन्या पेन्शन योजनेत काही सुधारणा सांगितल्या आहेत. त्या सुधारणाही राज्य सरकारने लागू केलेल्या नाहीत. त्यामुळे त्याबाबतही सरकारने विचार करावा. कर्मचार्यांचे निवृत्ती वय 60 वर्षे करावे यासह आदी मागण्यांबाबत राज्य सरकारी कर्मचार्यांनी दोन दिवसांच्या संपाची हाक दिली होती. तर संपात सहभागी होणार्या कर्मचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा राज्य सरकारने दिला होता. त्यानंतर अजित पवारांसोबत काल सर्व संघटनांची बैठक झाली. या बैठकीत राज्याच्या आर्थिक स्थितीचा मार्च 2022 अखेर आढावा घेऊन राज्य सरकारी कर्मचार्यांच्या वेतन त्रुटी दूर करणे, निवृत्ती वेतन योजनेत केंद्राप्रमाणे सुधारणा करण्यासह कर्मचार्यांच्या विविध मागण्यांचा योग्य विचार करण्याचे आश्वासन अजित पवारांनी दिले होते. त्यानंतर आज सकाळी सर्व संघटनांची बैठक झाली. या बैठकीत संप मागे घेण्याची घोषणा करणण्यात आली.