मुंबई : बहुचर्चित आलिया भटचा गंगुबाई काठियावाडी या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने कात्री फिरवली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरील एक सीन सेन्सॉर बोर्डाने हटवला आहे. तसेच सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या बदलामुळे चित्रपटाची लांबीही वाढली आहे.
संजय लीला भन्साली दिग्दर्शित आणि निर्मिती गंगुबाई काठियावाडचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रखडले होते. आता कोरोनाचे संकट कमी झाल्याने हा चित्रपट उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हुसैन झैदी आणि जेन बॉर्ग्स यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई यांच्या पुस्तकातील गंगुबाई काठियावली या व्यक्तीरेखेवर हा चित्रपट आधारित आहे. आलिया भटसह अजय देवगण, विजय राझ, जिम साराभ आणि सीमा पहावा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटात सेन्सॉर बोर्डाने चार बदल केले आहेत. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरु आणि गंगुबाई काठियावली यांची भेट होते, पंडित नेहरु गंगुबाईच्या खांद्यावर फूल लावतात असा एक सीन चित्रपटात होता. या सीनमध्ये सेन्सॉरने बदल करण्यास सांगितले आहे. तसेच चित्रपटातील एका सीनमध्ये शिवी आहे, ही शिवी बदलून सेन्सॉरने दुसरा शब्द दिल आहे. १७ सेकंदाच्या एका सीनमध्ये काही शिव्या होत्या, त्यातही सेन्सॉरने बदल करण्यास सांगितले आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या सुरूवातीला हिंदी आणि इंग्रजी डिस्क्लेमर टाकण्यास सांगितले आहे. त्यामुळे चित्रपटांची लांबी ४१ सेकंदांनी वाढली आहे. या चित्रपटात पंडित नेहरू आणि गंगुबाई काठियावाली यांची भेट होते. या ४३ सेकंदाच्या सीनवर सेन्सॉरने कात्री लावली आहे.
पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार गंगुबाई काठियावाली पंडित नेहरु यांची मुंबईतल्या वेश्यावस्तींसाठी भेट घेते. मुंबईत रेड लाईटचे महत्त्व काय आहे, ही वस्ती जर सरकारने हटवली तर काय परिणाम होतील यावर गंगुबाईने नेहरुंना सविस्तर सांगितले. त्यानंतर नेहरुंनी गंगुबाईला तु या व्यवसायात का आलीस? चांगली नोकरी शोधून किंवा चांगला मुलगा बघून का लग्न केले नाही अशी विचारणा केली होती. तेव्हा तुम्ही माझ्याशी लग्न करा, तुमची पत्नी व्हायला मला आवडेल अशी प्रतिक्रिया गंगुबाईने दिली होती. त्यावर नेहरु चिडले होते. तेव्हा गंगुबाई तेवढ्याच शांत स्वरात म्हणाली की गोष्टी बोलण्या इतक्या सोप्या नसतात. तेव्हा नेहरुंनी तिला वेश्यावस्ती न हटवण्याबद्दल जे करता येईल ते नकी करू असे आश्वासन दिले होते. उद्या २५ फेब्रुवारी शुक्रवारी हा चित्रपट देशात प्रदर्शित होत आहे. जिम साराभ हा नेहरुंची भूमिकेत दिसेल असे सांगण्यात येत आहे.