मुंबई : शिवसेना नेते आणि मुंबई महानगर पालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. ही छापेमारी २४ तास उलटले तरी सुरूच आहे. गेल्या २४ तासांपासून त्यांची आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. मात्र, आयकर विभागाकडून अद्यापही कोणत्याच गोष्टीला दुजोरा दिलेला नाही. आयकर विभागाने का छापा टाकला, तपासादरम्यान कोणती माहिती समोर आली याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी यशवंत जाधव यांच्या घरी ठिय्या मांडला आहे. शिवसैनिकांना आवरण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बुधवारी सकाळीच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीने छापा मारला होता. मात्र, आठ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. यशवंत जाधव यांच्या घऱी शुक्रवारी सकाळी आयकर विभागाने छापा मारला आहे. मात्र अद्यापही ही तपास सुरूच आहे. यशवंत जाधव यांनी परदेशात पैसा लपवून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. राज्यातील राजकारण सध्या अधिक तापल्याचं पाहायला मिळत आहे.
आयकर विभागाला चौकशी करीत असताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काल मुंबईच्या महापौर यांनी यशवंत जाधव यांच्या घराजवळ गेल्याचे पाहायला मिळाले. त्या म्हणाल्या की शिवसैनिक अधिक आक्रमक आहे, तसेच त्यांच्याकडून चुकूनही कोणतं कृत्य होऊ नये म्हणून मी या परिसरात आले आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांची खुशाल चौकशी करावी. ते आयकर विभागाच्या छापेमारीला योग्य उत्तर देतील असं त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.