रत्नागिरी : जिल्ह्यातील ८ विद्यार्थी युक्रेन मधील विविध कॉलेज कॅम्पस मध्ये अडकले असून आम्हाला लवकरात लवकर भारतात घेऊन जा अशी विनंती या विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडे केली आहे. हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन मधील विविध विद्यापीठातून शिक्षण घेत आहेत
रशिया – युक्रेनच्या युध्दामुळे जग चिंताग्रस्त झालेले असताना युक्रनमधे शिक्षणासाठी गेलेले देवरुख शहरामधील ३ विद्यार्थी तर लांजा , मंडणगड ,चिपळूण, रत्नागिरी, दापोली या तालुक्यातील प्रत्येकी एक विध्यार्थी युक्रेनमधे अडकलेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरूखचे विद्यार्थी अद्वैत विनोद कदम, जान्हवी राजा शिंदे आणि साक्षी प्रकाश (राजू) नरोटे युक्रेन मधील खारकीव्ह शहरात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. हे तिघेही कालपासून सुरू झालेल्या युद्धामुळे तिथे अडकले आहेत. हे विद्यार्थी ५ मार्च रोजी भारतात परतणार होते मात्र अचानक कालपासून सुरू झालेल्या युद्धात युक्रनमधे अडकले आहेत. यातील साक्षी नरोटे हिचे वडील राजु नरोटे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपली मुलगी सुरक्षित असल्याचे सांगितले. काल रात्री आणि आजही तिच्याशी संपर्क झाला असून तिने आम्ही सगळे सुरक्षित आहोत. आम्हाला बंकर मधे हलविण्यात आले असून भारत सरकार मदत करेल तेव्हा आम्ही बाहेर पडु असे तिने पालकांना सांगितले. तसेच अद्वैत कदम चे वडील विनोद कदम यांच्याशी संपर्क साधला असता आमचा पाल्य सुरक्षित असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
तसेच वृषभनाथ राजेंद्र मोलाज ( चिपळूण), सलोनी साजिद मणेर, (लांजा) आकाश अनंत कोणाक (मंडणगड), ऐश्वर्या मंगेश सावंत ( दापोली ) मुस्कान मन्सूर सोलकर ( रत्नागिरी ) या पाच विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीवरून ते सध्या सुखरूप आहेत. सोशल मिडिया द्वारे आमचा संवाद सुरू असून आम्ही याची माहिती जिल्हा आणि राज्य नियंत्रण कक्षाला दिली आहे असे विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले आहे.
दरम्यान, भारत सरकारने हेल्पलाईन सुरू केली असून भारतीयांना सुखरूप भारतात आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी विमानसेवा सज्ज केली असून अडकलेल्या भारतीयांना युक्रेनच्या शेजारील देशांची मदत घेतली जाणार असल्याचे वृत्त आहे. सर्वजण सुखरूप मायदेशी परत यावेत यासाठी देवरूखसह जिल्हावासीय प्रार्थना करत आहेत.
◾रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक युक्रेनच्या युद्धात अडकले असल्यास खालील हेल्पलाईनवर संपर्क साधावा
केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली
फोन-टोल फ्री 1800118797
फोन – 011-23012113/23014105 / 23017905
फॅक्स 011-23088124
ईमेल- situationroom@mea.gov.in
रत्नागिरी जिल्ह्यातील कोणतेही नागरिक, विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी सुशांत खांडेकर यांनी कळविले आहे.
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी फोन 02352-226248/ 222233
ईमेल-controlroomratnagiri@gmail.com या ई-मेल वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.