रत्नागिरी : भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष, विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांची रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचे अधिकृत पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आज सुपूर्द केले आहे. यामुळे आमदार प्रसाद लाड यांचे कोकणातून अभिनंदन करण्यात येत आहे.
भाजपाचे आमदार म्हणून काम करताना आमदार प्रसाद लाड यांनी कोकणात विशेषतः रत्नागिरीसाठी भरीव निधी दिला आहे. तसेच त्यांनी रत्नागिरीच्या विविध प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठवला आहे. कोरोनाच्या काळात रस्त्यावर उतरून काम करत आणि पुढाकार घेत कोविड सेंटर उभारणी असो वा नैसर्गिक आपत्ती असो या दोन्ही वेळी मदत करण्याचे काम आमदार प्रसाद लाड यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा जिल्हा पदाधिकाऱ्यांनीही चांगले योगदान दिले आहे. या सर्व कामाची दखल घेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी आमदार लाड यांच्याकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही नियुक्ती केल्याचे बोलले जात आहे. या माध्यमातून आमदार लाड यांचे पाठबळ कार्यकर्त्यांना लाभेल.
आमदार प्रसाद लाड यांच्या नियुक्तीबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी लाड यांचे अभिनंदन केले आहे. तसेच भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांची कोकण विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांची एमएमआरडीए क्षेत्रप्रमुख (मुंबई महानगर वगळून) नियुक्ती केली आहे.