पुणे : “आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची युती होणार असून, आम्हाला २५ जागा द्याव्यात, अशी आमची मागणी आहे. तसेच सत्ता आली आणि अनुसूचित जातीचे आरक्षण पडले, तर ‘रिपाइं’ला महापौर पद देण्याची मागणी करणार आहे,” असा पुनरुच्चार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
नवीन विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, नगरसेविका हिमाली कांबळे, असित गांगुर्डे, अल्पसंख्याक आघाडीचे ऍड. आयुब शेख, महिला आघाडीच्या संगीता आठवले, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनवणे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शाम सदाफुले आदी उपस्थित होते.
ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रव्यूहात
रामदास आठवले म्हणाले, “केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजप महाविकास आघाडी सरकार पडण्याचा प्रयत्न करतेय, यात तथ्य नाही. या यंत्रणा त्यांचे काम करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत भाजपसोबत यावे आणि युतीचे सरकार स्थापन करावे. ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध असून, याबाबत त्यांच्याशी बोलणार आहे.”
पाचही राज्यात भाजपाची सत्ता
“देशात होत असलेल्या पाचही राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपची सत्ता येईल. उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या कामावर समाधानी असून, या निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळेल. सर्व अनुसूचित जाती-जमातीमधील लोकांसाठी मोदींनी घेतलेले निर्णय, आणलेल्या योजना यामुळे त्यांचा फायदा होत आहे. भाजप प्रणित एनडीएला निर्भेळ यश मिळणार आहे,” असे आठवले यांनी नमूद केले.
शिवाजी महाराज स्वयंभू राजे
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते, यावरून विनाकारण वाद घालण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंभू राजे होते. शौर्य आणि धैर्याचे महामेरू होते. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, तर राजमाता जिजाऊ या महाराजांच्या गुरू होत्या. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत राज्यपालांना भेटून माझे मत सांगणार आहे. समर्थ रामदास स्वामी त्यांच्या जागी श्रेष्ठ असले, तरी छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्याही गुरूची आवश्यकता नव्हती. संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानले जात असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
‘…म्हणून परेशान युक्रेन’
रशिया-युक्रेन युद्धावर भाष्य करताना आठवले यांनी चारोळी करत ‘पुतीन यांचा बिघडला आहे ब्रेन, म्हणून परेशान आहे युक्रेन’ अशी टिपण्णी केली. त्याचबरोबर केंद्र सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केवळ टीका करू नये. सरकारला सूचना जरूर कराव्यात. एका भारतीय विद्यार्थ्याचा युक्रेनमध्ये मृत्यू झाला, ही दुःखद बाब आहे, असे आठवले यांनी नमूद केले.