काँग्रेसचे नेते व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी बुडलाणा जिल्हा दौऱ्यावर असताना आंबेडकर घराण्याबाबत केलेल्या घराणेशाहीच्या वक्तव्याबाबत वंचित बहुजन आघाडीमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वंचितच्या नेत्यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा हल्लाबोल केला असून, त्यांच्या उपाचारासाठी अकोल्यातील मानसोपचार तज्ज्ञांकडे मंत्री नितीन राऊत यांची नोंद करीत निषेध नोंदविला.
घराणेशाही बद्दल बोलताना नितीन राऊत यांना काँग्रेसच्या घराणेशाहीचा विसर कसा पडला? नेहरू नंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, मनेका गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी असे ओळीने पाया पडताय तर हरीजन काँग्रेसींचे ‘त्या’ बद्दल काय मत आहे, असा सवाल वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव व मीडिया पॅनसिल्ट राजेंद्र पातोडे यांनी विचारला आहे.
बाळासाहेब आंबेडकर यांना भेटण्याची इतकीच ओढ होती, तर चार दिवसाआधी बाळासाहेब नागपुरात होते, का गेला नाहीत? तुमच्यात दम असेल तर भाजपचे कोण नेते बाळासाहेब आंबेडकर यांना त्या तीन महिन्यांत भेटले, त्याचे पुरावे सार्वजनिक करा, अन्यथा नितीन राऊत यांना मानसिक उपचारासाठी अकोल्यात डॉ. केळकर यांची अपॉइंटमेंट बुक करू, नाहीतर आग्रा किंवा नागपूरमध्ये उपचार करून घेणार असाल तर आम्ही खर्च करायला तयार आहोत, अशी जळजळीत प्रतिक्रिया राजेंद्र पातोडे यांनी व्यक्त केली आहे.
तत्काळ कृती, १० पैशांची वर्गणी करणार..
डॉ. नितीन राऊत यांच्या वक्तव्याबाबत वंचित बहुजन आघाडीमध्ये उमटलेल्या प्रतिक्रियांचे पडसाद कार्यकर्त्यांपर्यंतही पोहोचले आहे. त्यापैकी एकाने डॉ. दीपक केळकर यांच्या अकोला येथील रुग्णालयात वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने मानसोपचार करण्यासाठी ओपीडीमध्ये नोंद करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्यात. पावती क्रमांक ७३४५ नुसार नितीन राऊत नागपूर यांचे उपचाराकरिता २०० रुपयांचे शुल्क वंचितचे कार्यकर्ते सचिन शिराळे यांनी दिले आहे. उपचाराला पैसे कमी पडू देणार नाही, असा संकल्प युवा आघाडीने करून काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांच्या निषेध व्यक्त केला. राऊत यांच्या उपचारासाठी प्रत्येकी 10 पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू करू, असेही कार्यकर्त्यांनी सांगितले.