युक्रेन आणि रशियात पेटलेले युध्द आज आठव्या दिवशीही सुरुच आहे. या युध्दात रशियाने युक्रेनमधील कीव, खारकीव शहरांवर हल्ला करुन ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. आतापर्यंत रशियाने युक्रेनवर आकाशातून बॉम्बद्वारे हवाई हल्ले केले. तसेच जमिनीवरुन गोळीबारांचा मारा केला. आता रशियाने युक्रेनला समुद्रमार्गेे घेरण्यास सुरुवात केली आहे. रशियाने युध्दासाठी युक्रेनमधील काळ्या समुद्रात मोठी लढाऊ जहाजे तैनात केली आहेत. रशियाच्या या भुमिकेमुळे युध्दाची तीव्रता अधिकच गडद होणार आहे.
युक्रेनवर रशियाचा हल्ला सलग आठव्या दिवशीही सुरुच आहे. रशियन सैन्याने राजधानी कीवला वेढा घातला आहे. रशियन सैैन्याने कीव येथील रेल्वे स्थानकावर क्षेपणास्त्र डागले. स्टेशनवरुन लोकांना बाहेर काढले जात असताना हा हल्ला करण्यात आला आहे. त्याचवेळी रशियन सैन्याने युक्रेनमधील तीन लाख लोकसंख्या असलेल्या खेरसन शहरावरही ताबा मिळवला. खेरसन शहराचे महापौर इगोर कोल्यखेव यांनी रशियन सैन्याने पोर्ट सिटी ताब्यात घेतल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. दुसरीकडे, युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी करत लढाई अजूनही सुरू असल्याचे म्हटले आहे. तसेच युक्रेनने केलेल्या हल्ल्यात रशियाचे मेजर जनरल आंद्रेई सुखोवेत्सकी यांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनने दावा केला की, त्यांच्या सैन्याने आज रशियाची 33 विमाने आणि 31 हेलिकॉप्टर पाडले. याचदरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी रशियन सैन्याला चेतावनी दिली आहे की, लवकरात लवकर त्यांनी युक्रेन सोडून जावे, आमची जमीन तुमच्या मृतदेहांनी माखून घ्यायची नाही. दरम्यान, रशियाने केलेल्या आक्रमक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनला जर्मनीचा पाठिंबा मिळाला आहे. जर्मनी युक्रेनला आणखी 2700 हवाई विरोधी क्षेपणास्त्र देणार आहे.