ऑस्ट्रेलियचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याचे निधन झाले आहे. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तो 52 वर्षांचा होता. वॉर्नच्या व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलियन मीडियाला दिलेल्या निवेदनात पुष्टी केली आहे की, “शेन थायलंडमधील व्हिलामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता.”
ऑस्ट्रेलियन न्यूज चॅनल फॉक्स स्पोर्टच्या वृत्तानुसार, शेन वॉर्न थायलंडमध्ये होता आणि तेथे त्याचा अचानक संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. शेन वॉर्नच्या व्यवस्थापन संस्थेच्या हवाल्याने फॉक्स स्पोर्टने एका निवेदनात म्हटले आहे की, वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जेथे तो शनिवारी सकाळी (ऑस्ट्रेलियन वेळेनुसार) बेशुद्धावस्थेत आढळला होता, परंतु वैद्यकीय पथकाच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही तो शुद्धीवर येऊ शकला नाही.