रत्नागिरी : रत्नागिरी आंबेडकरी चळवळीतील हरहुन्नरी तरुण दिपराज कांबळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 38 व्या वर्षी एका तरूण उमद्या कार्यकर्त्याचे अचानक जाण्याने रत्नागिरी तालुक्यासह शिरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अकाली निधनाने सर्वानाच धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.अशा शब्दात सोशल मीडियावर संवेदना व्यक्त केल्या जात आहे. दीपराज कांबळे यांनी अभिनय क्षेत्रात हि ठसा उमटवला होता. त्यांच्या पश्चात आई ,वडील ,पत्नी, लहान मुलगा, मोठा भाऊ असा परिवार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नूतन रत्नागिरी तालुका कार्यकारिणीचे कोषाध्यक्ष तसेच विविध संस्था मंडळावर ते पदाधिकारी होते.
रात्रीच्या सुमारास घरीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सकाळच्या सुमारास तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. सायंकाळी ४ :४५ च्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून मृतदेह शिरगाव बौद्धवाडी मधील निवासस्थानी आणण्यात आला. अंत्यसंस्कार विधीला शेकडो मित्रपरिवार, चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते.