⭕️ मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमित राघवन यांची प्रमुख उपस्थित
रत्नागिरी : मारुतीकाका सत्यशोधक-शिवप्रवर्तक समितीतर्फे संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जोयशीवाडी येथे प्रबोधनकार मारुतीकाका जोयशी यांच्या निवासस्थानी दि. ८ मार्च रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत क्रांतिकारी विचार घेवून महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
मारुतीकाका जोयशी यांच्या पत्नी कै. वासंती जोयशी यांचा प्रथम स्मृतिदिनही या दिवशी विविध स्तुत्य उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी देवरुख येथील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्रकार परिषदेप्रसंगी प्रबोधनकार मारुतीकाका जोयशी, विलास डिके, संतोष येलये, मिलिंद कडवईकर उपस्थित होते. समाजातील अनिष्ठ रुढींना छेद देत परिवर्तनवादी विचार घेवून गेली अनेक वर्षे साखरपा-जोयशीवाडी येथील मारुतीकाका जोयशी प्रबोधन व समाजपरिवर्तनाचे काम करत आहेत. याकामी त्यांना त्यांच्या पत्नी वासंती यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभत आले आहे.
त्यांच्या सहकार्यामुळे समाजपरिवर्तन व प्रबोधनाचे काम करताना प्रोत्साहन मिळायचे असे काका जोयशी आवर्जून सांगतात. क्रांतिकारी विचारांमध्ये नेहमी साथ देणाऱ्या वासंती जोयशी यांचे गतवर्षी महिला दिनीच निधन झाले. यावर्षीच्या महिला दिनी त्यांचा प्रथम स्मृतिदिन येत असून त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याबरोबरच क्रांतिकारी विचार घेवून त्यांच्या निवसास्थानी आगळ्यावेगळ्या पध्दतीने महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यकमाचे अध्यक्षस्थान वैदेही सावंत या भुषविणार आहेत. त्यांनी यापुर्वी विधवा महिलांचा हळदीकुंकू कार्यकम आयोजित करत विधवा महिलांचा सन्मान केला आहे. साखरपा येथे होणाऱ्या या महिला दिन कार्यकमाला मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमित राघवन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यकमात विधवा महिलांना व्यासपीठावर आणून त्यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच ज्या महिलांनी पतीच्या मृत्यूनंतर अंगावरील अलंकार काढले नाहीत, अशा महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. तर ज्या महिलांना पतीच्या मृत्यूनंतर अंगावरील अलंकार घालायचे आहेत. त्यांचे संमत्रीपत्र घेवून त्यांचाही यावेळी सन्मान केला जाणार आहे. कार्यक्रमात मान्यवर महिलांमधून आपले परिवर्तनवादी विचार व्यक्त केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे ‘सत्यशोधक शिवसंस्कार’ या पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाला आंबेडकर चळवळीचे जयू पवार, शाहिर वसंत भातडे, प्रतिभा साळुंखे आदी प्रमुख मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.